Corona : महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या वाटेवर? सरकारने जाहीर केले नवे निर्देश
Maharashtra

Corona : महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या वाटेवर? सरकारने जाहीर केले नवे निर्देश

मुंबई : कोरोना रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढत चालेला आकडा पाहता सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याच विषयावर नुकतेच राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून इतर ठिकाणी 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबतचे आदेश काढले आहेत. तसेच सर्व सरकारी व खाजगी कार्यालयांच्या विभाग प्रमुखांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. (New restrictions imposed in Maharashtra due to increasing cases of corona)

याशिवाय, नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाल्यामुळे कार्यालयांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. तसेच, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी वर्क फ्रॉम होम या पर्यायाला प्राधान्य देण्याचे म्हटले होते. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी गृहमंत्र्यांना पत्र : नारायण राणे 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना, संपर्क टाळण्यासाठी म्हणून ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही त्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचे म्हटले होते. तसेच, तुकड्या करत ऑफिसमधील विभागांमध्ये ही सुविधा सोयीनुसार दिली जाऊ शकते', असे ते म्हणाले होते. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर काही कोरोनाचा फैलाव पाहता शासनाने थेट 50 टक्के कर्मचारी संख्येचे आदेश दिले आहेत. आज राज्य शासनाने सर्व थिएटर, सभागृह व कार्यालये यांना 31 मार्चपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात काल एकाच दिवसात 25,833 कोरोनाची नवीन प्रकरणे आढळून आली होती. 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता राज्यातील औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, पुणे, नांदेड, ठाणे, पालघर, जळगाव, नागपूर, लातूर, धुळे, वर्धा, नाशिक यासारख्या जिल्ह्यांत निर्बंध घालण्यात आले आहेत. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवी प्रकरणे 60 टक्क्यांपेक्षा अधिक एकट्या महाराष्ट्रात असल्याचे म्हटले आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com