कतारला गेलेल्या नवविवाहित दाम्पत्याच्या नशिबी जन्मठेप!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

मोहम्मद शरीक व त्याची पत्नी ओनिबा कौसर गेल्या वर्षी जुलै महिन्यात मधुचंद्रासाठी कतारला गेले होते. त्यावेळी हमाद विमानतळावर त्यांच्याकडील बॅगेत चार किलो हशीश सापडले. तेथील जलदगती न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

मुंबई-  लग्नाची भेट म्हणून मावशीने मुंबईतील दाम्पत्याला दिलेले कतारमधील मधुचंद्राचे पॅकेज त्यांना चांगलेच महागात पडले. नातेवाईकांना देण्यासाठी मावशीने दिलेले पाकीट घेऊन दाम्पत्य कतारला पोहचले; परंतु विमानतळावरील तपासणीत त्यात ड्रग्ज सापडल्याने त्यांना दहा वर्षांची जन्मठेप ठोठावण्यात आली. वर्षभरानंतर त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले असून त्यांच्या सुटकेसाठी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमातून कतार प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

 एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. मोहम्मद शरीक व त्याची पत्नी ओनिबा कौसर गेल्या वर्षी जुलै महिन्यात मधुचंद्रासाठी कतारला गेले होते. त्यावेळी हमाद विमानतळावर त्यांच्याकडील बॅगेत चार किलो हशीश सापडले. तेथील जलदगती न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

संबंधित बॅग शरीकची मावशी तब्बसूम कुरेशीने त्यांच्याकडे दिली होती. म्हणून ओनिबा यांचे वडील शकील कुरेशी यांनी तब्बसूम कुरेशी व तिचा साथीदार निजाम कारा यांनी आपली मुलगी आणि जावयाला ड्रग्जप्रकरणी अडकवल्याची तक्रार एनसीबीकडे केली होती. 
मधुचंद्रासाठी आरोपींनी दाम्पत्याला परदेशात पाठवले व त्यांना माहिती न देता त्यांच्या सामानात अमली पदार्थ लपवले, असे तक्रारीत म्हणत त्यांनी महत्त्वाचे पुरावे व संभाषणही सादर केले. आरोपी महिलेने जर्दा असल्याच्या नावाखाली दाम्पत्याच्या बॅगेत हशीश ठेवले होते. एनसीबीने केलेल्या तपासात कारा याने तबस्सूमच्या मदतीने सर्व प्रकार घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. 

कारा व तबस्सूम दोघांनाही गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या प्रकरणी आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर नुकतीच दोघांना एनसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी आता एनसीबी सर्व पुरावे कतारच्या संबंधित यंत्रणांना पाठवणार आहे. नवविवाहित दाम्पत्यांना नातेवाईकांनी अडकवल्याची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. एनसीबीचे महासंचालक अस्थाना यांनी मुंबईत येऊन सर्व कार्यवाहीची पडताळणी केली. 
 

संबंधित बातम्या