"निसर्ग' वादळ आज धडकणार

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

मंडणगड, गुहागर, दापोलीत हाय अलर्ट, जिल्ह्यात संचारबंदी लागू; चार हजार लोकांचे स्थलांतर, वादळी वाऱ्याचा वेग प्रतितास 80 किलोमीटर इतका शक्‍य
 

रत्नागिरी

"निसर्ग' चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मंडणगड, गुहागर, दापोली या तीन तालुक्‍यांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे तेथे हाय अलर्ट जाहीर केला आहे. त्या भागातील चार हजार लोकांचे स्थलांतर केले आहे. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी बुधवारी (ता. 3) संचारबंदी लागू केल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. चक्रीवादळाचा परिणाम उद्या पहाटेपासून होणार असून सकाळी 9 ते दुपारी 12 या कालावधीत ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत वीजपुरवठा पूर्णतः खंडित ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्त भडकवाड उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळी गोवा, सिंधुदुर्गपासून पुढे सरकत होते. ते वादळ पहाटेच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागाकडून अलिबागकडे रवाना होणार आहे. एनडीआरएफची वीस जणांची एक तुकडी जिल्ह्यात दाखल झाली असून दापोली येथे थांबणार आहे. दुसरी तुकडी दाखल होत असून ती मंडणगडमध्ये थांबवण्यात आली आहे. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी चार बोटी, कटर, लाईट यांसारखे साहित्य पथकाकडे उपलब्ध आहे. आवश्‍यकता भासल्यास मत्स्य विभागाच्या सहकार्याने मच्छीमारी नौकांची मदत घेतली जाईल.
वादळाचा सर्वाधिक तडाखा मंडणगड, दापोली, गुहागर या किनारी भागांना बसू शकतो. रत्नागिरी, राजापूरचा किनारी भाग कमी प्रभावित होईल. मंडणगड तालुक्‍यातील बाणकोट, वेसवी, वेळास या किनारी भागातील सुमारे 1200, दापोलीतील 235 तर गुहागरमधील 1196 लोकांचे स्थलांतर मंगळवारी सायंकाळपर्यंत केले होते. एकट्या दापोली तालुक्‍यातील 23 गावे किनाऱ्यावर असून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या तीन तालुक्‍यांतील पावणेतीन हजार लोकांचे स्थलांतर मंगळवारी केले. सुमारे चार हजारांहून अधिक लोक स्थलांतरित केले जाणार आहेत.
वादळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून महावितरण, बंदर विभाग, मत्स्य विभाग, जिल्हा परिषद, पालिकांसह तालुकापातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. वादळात जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संचारबंदी लागू केली आहे. अंतर्गत वाहतुकीसह जिल्ह्यातील सगळ्या कंपन्या बंद ठेवण्यात येणार आहेत. पहाटेपासून वादळाचा प्रभाव जाणवण्यास सुरवात होईल. त्याचा वेग सकाळी नऊला ताशी 80 किलोमीटर इतका असू शकतो. त्यामुळे किनारी भागातील गावांमध्ये मोठी हानी होऊ शकते. परिणामी सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे धरणांना धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून संबंधित यंत्रणेला पाहणी करून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास धरणाखालील लोकांनाही सूचना दिल्या आहेत. फयाननंतर दहा वर्षांनी अशा प्रकारचे वादळ निर्माण होत आहे. गावपातळीवर मदत करण्यासाठी खासगी संस्थांच्या सदस्यांसह प्रशिक्षित तरुणांना पथकात सहभागी करून घेतले आहे.

आज काय घडणार?
0 निसर्ग चक्रीवादळ सकाळी धडकणार
0 सकाळी नऊपासून वेगवान वारे आदळणार
0 वाऱ्याचा वेग 80 किलोमीटर प्रतितास राहणार
0 किनारी भागातील 23 गावांत सतर्कता
0 या गावांतील लोकांचे स्थलांतर
0 सकाळी नऊपासून वीजपुरवठा खंडित ठेवणार
0 जिल्हाभरात संचारबंदी लागू
0 औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योग बंद
0 एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल

खासगी वाहने अधिग्रहित करणार
तालुकास्तरावर औषधसाठा, 64 रुग्णवाहिका सज्ज आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपत्ती ओढवल्यास वाहनांची गरज भासली तर कोणतेही खासगी वाहन अधिग्रहित करण्याचे अधिकार तहसीलदारांना असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या