Nitin Gadkari Birthday Special: गडकरी साहेब, तुम्ही टेंडर काढलं, ते धीरूभाईंनी भरलं

Nitin Gadkari
Nitin Gadkari

'रस्तेवाला माणूस' म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) ओळखलं जात. देशात ते दररोज 25  किमी चा रस्ता बांधतात असं सांगितंल जातं. आणि विशेष म्हणजे कमी खर्चात व विक्रमी वेळेत. काही दिवसांपूर्वीच सोलापूर- विजापूर महामार्गावर एकाच लेनवर सलग 18 तासात 25  किमी चा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. या रस्त्याच्या बांधणीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. केंद्रातच नव्हे तर महाराष्ट्रात असल्यापासून नितीन गडकरींना अशी आव्हानात्मक कामे करण्यासाठी ओळखलं जातं. असाच एका आव्हानात्मक कामाचा किस्सा नितीन गडकरींनी एका कार्यक्रामादरम्यान सांगितला आहे. ते साल होतं 1996 यावेळी महाराष्ट्रात युतीचं सरकार आणि मुख्यमंत्री होते मनोहर जोशी (Manohar Joshi). जोशींच्या मंत्रीमंडळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. (Nitin Gadkari Birthday Special Dhirubhai Ambani had admitted defeat in front of Nitin Gadkari)

राज्यशासनाकडून हायवेचं टेंडर काढण्यात आलं होतं. त्यामध्ये सगळ्यात कमी टेंडर रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा धीरुभाई अंबानींनी (Dhirubhai Ambani) भरलं होतं. ते अगदी 3 हजार 600 कोटींचं. परंतु गडकरींचा अदांज होता की, ते काम 2 हजार कोटीचं आहे आणि ते तेवढ्यातच पूर्ण होऊ शकतं. ते तडक राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याकडे गेले त्यांना सांगितले की, हे काम 2 हजार कोटीपेक्षा जास्त नाही आणि सर्वात कमी  टेंडर अंबानींच्या रिलायन्स समूहाचे आहे. त्यांनी 3 हजार 600 कोटी रुपयाचं टेंडर भरलं आहे. त्यामुळे मला व्यक्तीश:हा वाटतं की, हे टेंडर रिजेक्ट करण्यात यावं. परंतु त्यामध्ये दोन मतप्रवाह होते. त्यावेळचे मंत्री सुरेश जैन हे देखील यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, 'साहेब हे बघा तुम्ही हे टेंडर काढलं आहे आणि त्यांनी ते टेंडर भरलं आहे. नियमानुसार जे कमी आहे ते त्यांना दिलं पाहिजे' मंत्रीमंडळातील इतर मंत्रीही अबांनींना टेंडर नाकारण्याच्या विरोधात होते.

परंतु दुसरीकडे हे काम 2 हजार कोटींपेक्षा जास्त नाही या भूमिकेवर गडकरी अडून बसले होते. आपण हे काम कमी खर्चात करु शकतो हा त्यांना विश्वास होता. त्यांनी गोपीनाथरावांना हे टेंडर नाकारण्यास तयार केलं. तर मुंडेनी मुख्यमंत्री जोशींना तयार केलं. मात्र हे काम कसं होणार हा प्रश्न गुलदस्त्याचं होता. जोशींनी गडकरींना विचारलं की, 'पैसे कोठून उभा करशील नितीन?' त्यावर नितीन गडकरी म्हणाले, 'सर माझ्यावर विश्वास ठेवा' अखेर गडकरींवर विश्वास ठेवून धीरुभाईंना हे टेंडर नाकारण्यात आलं. धीरुभाईंचे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप नेते प्रमोद महाजन यांच्याशी चांगले संबंध होते. गडकरींनी हे टेंडर नाकारल्यामुळे अंबानींनी या दोघांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती.

प्रमोद महाजन एक दिवस गडकरींना म्हणाले, 'धीरुभाई बरेच नाराज झाले आहेत, तू एकदा त्यांना जाऊन समजावावं.' त्यासाठी मेहकर चेंबर्समध्ये जेवनाचं नियोजन ठरलं. यावेळी रिलायन्स समूहाचे प्रमुख धीरुभाई अंबानी अनिल आणि मुकेश अंबानी हे दोन्ही भाऊ आणि त्यावेळचे रिलायन्सचे व्हाईट प्रेसिडेंट नितीन चैनी उपस्थित होते. धीरुभाई अद्यापर्यंत नाराज होते. जेवत असताना विषय निघाला, आणि धीरुभाई नितीन गडकरींना म्हणाले, 'कैसे रोड बनेगा रोड नितीन, ये टेंडर तो आपने रिजेक्ट किया है,' त्यावर गडकरी उत्तरले,  'होगा धीरुभाई, मै करके दिखाऊंगा,' त्यावर धीरुभाई म्हणाले, 'क्या होगा बोलने वाले लोग बहुत होते है, मैने बहुत देखा है, ये कुछ नही होगा.' या वाक्यावर शांत असणाऱ्या गडकरींचा इगो दुखावला. आणि गडकरींनी सरळ धीरुभाईंना आव्हान दिलं. ते म्हणाले, 'धीरुभाई अगर मै ये रोड नही बना पाया तो ये जो मुछे रखी है ये काट दूंगा, और बोल दूंगा की, धीरुभाई जीत गये, मै हार गया. पर मै रोड बना पाया तो आप क्या करेंगे?' त्यावर धीरुभाईंना पुन्हा एकदा ना चा पाढा वाचायला सुरुवात केली. धीरुभाईंची समजूत काढण्यासाठी गेलेले नितीन गडकरी त्यांनाच आव्हान देऊन परत आले होते. 

माघारी आल्यानंतर गडकरींनी प्रोजेक्टसाठी पैसे उभारण्यासाठी महाराष्ट्र 'राज्य रस्ते विकास महामंडळाची' स्थापना केली. गुंतवणूकदार शोधण्याचे एकदम जिकरीचे काम स्वत: लक्ष घालून गडकरींनी पूर्ण केलं. रस्त्याचं काम सुरु झालं. हे काम पाहण्यासाठी मुंगीरवार नावाचे मुख्य अभियंता होते. हायवेचं काम पूर्ण होत आलं असताना एक दिवस धीरुभाई हेलीकॉप्टरमधून काम पाहिलं. त्यांनी नितीन चैनी यांच्याकरवी गडकरींना भेटण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रण पाठवलं. गडकरींना परत एकदा धीरुभाईंचं बोलवनं आल्यानंतर मेहकर चेंबर्स मध्ये भेटण्यासाठी गडकरी गेले. आणि आल्या आल्या धीरुभाईंचं  पहिलं वाक्य होतं की,  'नितीन मै हार गया और आप जीत गये, आपने करके दिखाया अब रोड हो गया.' 

नितीन गडकरींनी 3 हजार 600 कोटींचा हायवे 2 हजार कोटीत बांधून दाखवला, आणि त्यांची मिशी देखील वाचली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com