चाकरमानी प्रवेशाची डेडलाईन नाही

विनोद दळवी
शुक्रवार, 10 जुलै 2020

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, नियोजन बैठकीचे इतिवृत्त "व्हायरल'

ओरोस

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चाकरमान्यांना प्रवेशासाठी अद्याप कोणतीही डेडलाईन ठरलेली नाही. शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर यावरचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले.
गणेशोत्सव काळात सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेश भक्तांना आणि नागरिकांना सात ऑगस्टला रात्री 12 पर्यंतच प्रवेश घेता येईल, अशा आशयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे इतिवृत्त आज सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. यामुळे संभ्रम निर्माण झाला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
शासनाचे लॉकडाउन 31 जुलैपर्यंत असून या कालावधीपर्यंत ई-पास शिवाय जिल्ह्यात प्रवेश मिळू शकत नाही; मात्र त्यानंतर गणेश चतुर्थीचा असून प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या संख्येने मुंबईकर आणि परजिल्हातील नागरिक आपल्या घरी गणेश दर्शनासाठी दाखल होण्यास इच्छुक आहेत. कोरोना रेड झोनमधून मोठ्या संख्येने नागरिक येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक येतील म्हणून त्यांचे त्यापूर्वी चौदा दिवसांचे क्‍वारंटाईन पूर्ण व्हावे व नंतर त्यांना गणेशोत्सवात सहभागी होता येईल, या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली होती. या नियोजनासाठी काही प्रारुप नियम तयार करण्यात आले आहेत. त्या इतिवृत्ताची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली.
दरम्यान, कालच जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना गणेशभक्तांसाठी एक नियमावली करण्यात येत आहे, त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचे सांगितले होते. गणेशभक्तांच्या प्रवेशाचे नियोजन करण्यासाठी व त्यांचा क्‍वारंटाईन काळ पूर्ण करण्यासाठी काही नियमावली केली होती. गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला आहे. तत्पूर्वी म्हणजे 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात प्रवेश दिल्यास येणाऱ्या लोकांचे क्‍वारंटाईन काळ पूर्ण करून त्यांना गणेशोत्सवात सहभागी होता येईल, असे प्रारुप नियोजन यात झाले होते; मात्र या अटी शर्तींचा प्रारूप मसुदा व या बैठकीच्या इतिवृत्तास शासनाने मान्यता दिल्यानंतर आपण आदेश काढू, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केले.
या जिल्ह्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त दाखल होतील, असा अंदाज असल्याने त्यांच्या नियोजनास अजून पुरेसा वेळ आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामपंचायती व ग्राम समित्यांकडे क्‍वारंटाईन व्यवस्थेची जबाबदारी राहणार असून त्यांनाही या बैठकीनंतर कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रवेशद्वारे तसेच आरोग्य, पोलिस व महसूल यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचा या नियोजनात सहभाग असल्याने सर्व संबंधित विभागांनाही या बैठकीची व या बैठकीत दिलेल्या सूचनांची माहिती देण्यात आली आहे. सध्या तरी ही पूर्वतयारी असून मुख्यमंत्री किंवा राज्य शासनाने लॉकडाउनबाबत पुढील निर्णय घेतल्यावर व या इतिवृत्तास शासनाची मंजुरी मिळाल्यावर अंतिम निर्णय होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

लॉकडाउनबाबत वाढीव मुदतवाढ किंवा गणेश चतुर्थी काळात जिल्ह्यात प्रवेशबंदी याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतरच जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन अमलात येईल. या नियोजनाच्या बैठकीचे ते इतिवृत्त आहे. आमच्या यंत्रणांना ते सूचना व मार्गदर्शन आहे. हे आदेश नाहीत
- के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या