प्रवासी रेल्वेसेवा 12 ऑगस्टपर्यंत बंदच

Dainik Gomantak
शनिवार, 27 जून 2020

रेल्वे बोर्डाचा निर्णय; प्रवाशांना मिळणार बुकिंग तिकीटाची संपूर्ण रक्‍कम

सोलापूर

कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू केला. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्याने 1 जुलैपासून देशातील रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला आहे. परंतु, 1 जूनपासून सुरु असलेल्या विशेष राजधानी व मेल एक्‍स्प्रेस सुरुच राहतील, असेही रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
देशात 12 ऑगस्टपर्यंत नियमित धावणाऱ्या मेल एक्‍स्प्रेस व उपनगरीय सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, 1 जुलै ते 12 ऑगस्ट 2020 या कालावधीत प्रवास करण्यासाठी तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांना तिकीटाची पूर्ण रक्‍कम परत दिली जाणार आहे. 12 मे आणि 1 जूनपासून सुरु असलेल्या विशेष राजधानी एक्‍स्प्रेस व मेल एक्‍सप्रेस सुरुच राहतील, असे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांनी सांगितले. नव्या गाड्या सुरु करण्यासंदर्भात रेल्वे बोर्ड निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

मध्य रेल्वेतर्फे माल वाहतुदारांशी ऑनलाईन बैठक
मध्य रेल्वेवरील मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या ग्राहकांशी रेल्वे प्रशासनाची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीसाठी रेल्वेचे मुख्य सचिव बी.के. दादाभॉय, मुख्य परिचालन व्यवस्थापक डी. के. सिंग, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक पी. के. रानडे, के.एन. सिंग, प्रभात रंजन, डी. सेनगुप्ता आदी अधिकारी उपस्थित होते. कमोडिटी लोडर्समध्ये वेस्टर्न कोल फील्ड्‌स लि. (कोळसा), जिंदल स्टील लिमिटेड (मेटकोक, लोह स्टील), कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इतर कंटेनर ट्रेन ऑपरेटर, राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स, दीपक फर्टिलायझर्स (खते), बीपीसीएल, आयओसीएल (तेल कंपन्या), एसीसी, अल्ट्राटेक, अंबुजा सिमेंट, ओरिएंट सिमेंट, चेटीनाड सिमेंट , महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग नोंदविला. पुढील चार वर्षांसाठी फ्रेट ट्रॅफिक, लोडिंग प्रोजेक्‍शन्स वाढविणे यासह अन्य विषयांवर चर्चा झाली.

संबंधित बातम्या