आर्यन खान विरोधात पुरावे मिळाले नाहीत: मुंबई उच्च न्यायालय
Aryan KhanDainik Gomantak

आर्यन खान विरोधात पुरावे मिळाले नाहीत: मुंबई उच्च न्यायालय

आर्यनने (Aryan Khan Case) गुन्हा करण्याचा कट रचला हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलेल्या आर्यन खान प्रकरणासंबंधी (Aryan Khan Case) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले की, आर्यनने गुन्हा करण्याचा कट रचला हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. न्यायमूर्ती एन. डब्ल्यू सांबरे (Justice N. W. Sambre) यांच्या एकल खंडपीठाने 28 ऑक्टोबर रोजी आर्यन खान (Aryan Khan), त्याचा मित्र अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि फॅशन मॉडेल मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. या आदेशाची सविस्तर प्रत शनिवारी उपलब्ध करुन देण्यात आली.

कोर्टाने पुढे म्हटले की, आर्यन खानच्या फोनवरुन मिळवलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सच्या अवलोकनावरुन असे दिसून येते की, त्याने मर्चंट, धमेचा आणि या प्रकरणातील इतर आरोपींसह गुन्हा करण्याचा कट रचला असल्याचे कोणतेही आक्षेपार्ह पुरावे मिळाले नाहीत. उच्च न्यायालयाने घातलेल्या जामिनाच्या अटींनुसार, त्याला दर शुक्रवारी दक्षिण मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागेल. तसेच आर्यनसह आरबाज मर्चंट आणि धमेचा यांनाही देश न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Aryan Khan
Aryan Khan Case: समीर वानखेडेंच्या जागी नियुक्त केलेले संजय कुमार सिंग नेमके कोण?

जाणून घ्या काय म्हणाले हायकोर्ट

एनडीपीएस कायद्याचे कलम 67 अंतर्गत एनसीबीने नोंदवलेले आर्यन खानचे कबुलीजबाब केवळ तपासाच्या उद्देशाने विचारात घेतले जाऊ शकतात, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. आरोपींनी NDPS कायद्यांतर्गत गुन्हा केला असल्याचे अनुमान काढण्यासाठी याचा साधन म्हणून वापर केला जाऊ शकत नसल्याचे देखील न्यायालयाने यावेळी नमूद केले. सर्व आरोपींनी समान हेतूने बेकायदेशीर कृत्ये करण्यास सहमती दर्शविली असल्याचे न्यायालयाला पटवून देण्यासाठी रेकॉर्डवर कोणताही पुरावा नसल्याचे म्हणत न्यायालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चा युक्तिवाद नाकारला. त्याऐवजी आतापर्यंत केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांची कथित गुन्ह्याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही. न्यायमूर्ती सांबरे म्हणाले की, फिर्यादी खटल्याचाही विचार केला तर अशा गुन्ह्याची कमाल शिक्षा एक वर्षांपेक्षा जास्त नसावी. आर्यन खानला 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड तुरुंगातून सोडण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com