ढिसाळ कारभाराच्या विरोधात केईएममधील परिचारिकांचा ठिय्या

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

मागण्या पूर्ण करण्याच्या अधिष्ठात्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

मुंबई

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनंतर सोमवारी परिचारिकांनीदेखील आपल्या मागण्यांसाठी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अधिष्ठात्यांनी तातडीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले; मात्र अनेकदा दिलेली आश्‍वासने पूर्ण होत नसून आमची फसवणूक होत असल्याची भावना त्या परिचारिकांनी व्यक्त करत अधिष्ठात्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना काळात डॉक्‍टरांइतकेच कर्तव्य परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी बजावतात. त्यानंतरही परिचारिका किंवा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास स्वॅब न घेणे, उपचार न करणे असे प्रकार होत असल्याने परिचारिकांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ठिय्या आंदोलन केले.
केईएम रुग्णालयात आजतागायत सुमारे 45 परिचारिका कोरोनाबाधित झाल्या आहेत; मात्र तरीदेखील परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना स्वतंत्र वॉर्ड देण्यात आलेला नाही. अधिष्ठात्यांकडे मागण्या किंवा प्रश्‍न घेऊन गेल्यावर ते दुर्लक्ष करतात. दिलेले किट आठ ते 10 तास वापरायला सांगत असल्याचे आरोप या वेळी करण्यात आले.

परिचारिकांना महिनाभर काम
राज्य शासनाच्या सात दिवस काम आणि सात दिवस सुट्टीचा नियम लागू असताना परिचारिकांना जूनपासून महिनाभर कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काम करताना एखाद्या परिचारिकेला बाधा झाली, तर तिला दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते, असे आंदोलनकर्त्या परिचारिकांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या