अनुस्करातील शेतात आढळली प्राचीन नाणी

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

मडके फुटल्याने त्या भोवतीही नाणी विखुरली होती.

कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्‍यातील अनुस्कुरा येथील शेतात सपाटीकरण करताना प्राचीन नाण्यांचा खजिना सापडला आहे. तेथील शेतकरी विनायक बापूसाहेब पाटील त्यांच्या शेतात (गट क्रमांक 186) काजू लागवडीसाठी सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने जमिनीचे सपाटीकरण करत होते. त्यावेळी एक मडके फुटल्याचे दिसले. त्याची पाहणी केली असता त्यात प्राचीन नाणी आढळली. मडके फुटल्याने त्या भोवतीही नाणी विखुरली होती.
श्री. पाटील यांनी फुटलेले मडके, त्यातील आणि विखुरलेली नाणी असे एकत्र केले आणि त्यानंतर पोलिसपाटलांना याची माहिती दिली. त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास बुधवारी (ता.27) कळवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांत अमित माळी, शाहूवाडी तहसीलदार गुरु बिराजदार, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले यांनी बुधवारी रात्री अकरा वाजता घटनास्थळास भेट दिली व परिसराची पाहणी केली. जेसीबीच्या साहाय्याने मडके सापडलेल्या परिसरात आणखी खोदाई करून काही सापडते का, याचीही पाहणी केली. तसे काही सापडले नाही. त्यानंतर या पथकाने पाटील यांच्या शेतातील घरास दिली. तेथे असलेला प्राचीन खजिना पंचासमक्ष ताब्यात घेतला. त्याची मोजदाद केली. या घटनेचा पंचनामा करून शाहूवाडी तहसील कार्यालयाने हा ऐवज ताब्यात घेतला. ही नाणी तपासणीसाठी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देणार असल्याचे शाहूवाडी- पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी सांगितले. यावेळी अव्वल कारकून नारायण पोवार, करंजफेण मंडल अधिकारी राजेंद्र सुतार, अनुस्कुराचे तलाठी पी. के. मिठारी, ग्रामसेवक सुभाष पाटील, कृषी अधिकारी प्रसन्न पोतदार, पोलिस पाटील मनोहर पाटील, सरपंच हुसेन साठविलकर, कोतवाल संदीप कांबळे उपस्थित होते.

शेतकऱ्याचे कौतुक
विनायक पाटील मूळचे राधानगरी येथील टिटवे येथील आहेत. ते सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना शेतीची आवड आहे. त्यांनी मार्च 2018 मध्ये अनुस्कुरा येथे 3.67 एकर जमीन खरेदी केली. त्यामध्ये काजू लागवड करत असताना हा खजिना सापडला. त्यांनी याची माहिती प्रशासनास दिल्याने त्यांचे अनुस्कुरा पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

सातवाहन काळातील प्राचीन व्यापारी मार्ग
सम्राट अशोकाच्या काळात सातवाहन घराणे मांडलिक होते. पुढे बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडानंतर सातवाहन घराण्याने पैठण येथे स्वत:चे राज्य स्थापन केले. या सातवाहनाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्रातील नाणेघाटाप्रमाणेच अनुस्कुरा येथेही प्राचीन व्यापारी घाटमार्ग होता. व्यापारासाठी देश व कोकणाला जोडत हा घाट मार्ग सातवाहन काळात तयार करण्यात आला. सुमारे सतराशे वर्षांपूर्वीचा हा पक्का मार्ग आहे.

संबंधित बातम्या