कुटुंबासाठी गावोगावी वृद्धेने मागितली भीक

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

मरणघटिका येताच कुटुंबाने केला कोरोना झाल्याचा आरोप

सटाणा

आयुष्यभर मोलमजुरी आणि काबाडकष्ट करून कुटुंबाला घडवले... डोळ्यासमोर एकुलता एक मुलगा आणि सुनेचा मृत्यू बघितला... त्यांच्या निधनानंतर नातवासोबत राहत असलेली, लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेली, गावोगावी भटकून, भीक मागून मिळेल तिथे भाजी -भाकरी खाऊन दिवस काढणाऱ्या 85 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या नशिबी मरणानंतरही फरफटच आली. येथील सामाजिक कार्यकर्ते व वन स्टॉप सेंटर समितीचे जिल्हा सदस्य शाम बगडाणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या हरवलेल्या वृद्ध महिलेची सेवाशुश्रूषा केली. दुर्दैवाने निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी कोरोनाच्या भीतीने तिचा मृतदेह घेण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर श्री. बगडाणे यांच्या समयसूचकतेमुळे वृद्ध महिलेवर तिच्या घरीच अंत्यसंस्कार झाले. ही घटना घडली ती विंचुरे (ता. बागलाण) येथे.

विंचुरे (ता.बागलाण) येथील पवार कुटुंबीयांवर लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली. कुटुंबप्रमुख असलेली धन्याबाई मोतीराम पवार (वय 85) ही वयोवृद्ध महिला अन्नाच्या शोधार्थ कुणालाही न सांगता घराबाहेर पडली. भीक मागता मागता गावोगावी भटकंती केल्यानंतर सात दिवसांपूर्वी मोरेनगर (ता.बागलाण) येथे पोहोचली. उन्हातान्हात पायी चालल्याने तिच्या पायाला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. वृद्ध जखमी महिलेची माहिती सामाजिक कार्यकर्ते शाम बगडाणे यांना समजताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच या अनोळखी महिलेबाबत पोलिस ठाण्यात माहितीही दिली.
बगडाणे यांनी पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलिस नाईक बी.आर. निरभवणे यांच्या सहाय्याने महिलेच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश येत होते. उपचारांना प्रतिसाद देत असतानाच अखेर शुक्रवारी (ता.29) तिची प्राणज्योत मालवली. ग्रामीण रुग्णालयातील शवागारात महिलेचा मृतदेह तीन दिवस ठेवण्यात आला. मात्र महिलेची ओळख पटविण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याने अखेर बगडाणे यांनीच महिलेचे पालकत्व स्वीकारून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. दरम्यान, सोशल मीडियावरील वृद्ध महिलेचे छायाचित्र बघून विंचुरे (ता.बागलाण) येथील पोलिस पाटील पोपट बच्छाव यांनी बगडाणे यांच्याशी संपर्क साधून महिला गावातील संतोष पवार यांच्या आजी असल्याचे कळविले. त्यानुसार संतोषला घेऊन ते सटाणा येथे आले. मात्र कोरोनामुळे आजीचा मृत्यू झाल्याच्या भीतीने आम्ही तिचा मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका नातूने घेतली. यावेळी बगडाणे, राजेंद्र देवरे, पोलिस नाईक निरभवणे, पोलिस पाटील बच्छाव, खमताणेचे पोलिस पाटील योगेश बागूल आदींनी संतोषची समजून काढल्यानंतर त्याने आजीचा मृतदेह ताब्यात घेतला अन्‌ विंचुरे येथे तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

उपाशीपोटी अनवाणी, जखमी अवस्थेत फिरत असलेल्या धन्याबाई पवार या वृद्धेची अवस्था बिकट होती. नावाव्यतिरिक्त तिला काहीच सांगता येत नव्हते. दुर्दैवाने तिचे निधन झाले. पोलिस विभाग, ग्रामीण रुग्णालय, विंचुरे व खमताणे येथील पोलिस पाटील यांच्या मदतीमुळेच तिच्या कुटुंबियांचा शोध लावण्यात यश आले आणि तिच्यावर अंत्यसंस्कार झाले.
- शाम बगडाणे

संबंधित बातम्या