फिल्मस्टार बनवायचे प्रलोभन देऊन 'तो' चालवायचा चाईल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

आरोपीने अमेरिका, युरोप व दक्षिण आशियातील हजारांहून अधिक मुलांशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मुले १० ते १६ वयोगटातील आहेत. घरात राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत मोबाईलसह लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.

मुंबई-  अल्पवयीन मुलांना फिल्मस्टार बनवण्याचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मिळवून त्यांना पोर्नोग्राफीमध्ये ढकलणाऱ्या मुंबईतील ३० वर्षीय व्यक्तीविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयने घरामध्ये शोधमोहीम राबवली.

प्राथमिक तपासात आरोपीने अमेरिका, युरोप व दक्षिण आशियातील हजारांहून अधिक मुलांशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मुले १० ते १६ वयोगटातील आहेत. घरात राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत मोबाईलसह लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. सायबर न्यायवैद्यक तज्ज्ञांची याप्रकरणी मदत घेण्यात येत आहे. आरोपीने व्हॉट्‌सऍप व इतर माध्यमांच्या साह्याने परदेशी ग्राहकांना अश्‍लील फोटो व व्हिडीओ विकला असल्याचा संशय आहे. 

आरोपी स्वतःला फिल्म कलाकार असल्याचे सांगून अल्पवयीन मुलांना फिल्म स्टार बनवण्याचे प्रलोभन दाखवायचा. त्यानंतर त्यांच्याकडून आलेले फोटो, व्हिडीओ बनवायचा. त्याच्या साह्याने ब्लॅक मेल करायचा आणि व्हिडीओ कॉलिंगच्या साह्याने त्यांच्यावर लाईव्ह पोर्नोग्राफी करण्यासाठी दबाव टाकायचा, असा संशय आहे. व्हिडीओ पुढे परदेशी ग्राहकांना वितरित करण्यात यायचे. एखाद्याने त्याचे ऐकण्यास नकार दिल्यास आरोपी त्याचे अश्‍लील फोटो कुटुंबीय व नातेवाईकांना पाठवण्याची धमकी द्यायचा. 

संबंधित बातम्या