विरोधी पक्षनेते फडणवीस आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

पडवेत कोविड लॅबचे उद्‌घाटन

कणकवली

पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजममध्ये कोविड-19 टेस्ट लॅब उद्या (ता.9) पासून कार्यान्वित होत आहे. त्याचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी पाचला कार्यक्रम आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गात कोरोना लॅब उभारणीवरून भाजप आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांमध्ये राजकारण रंगले होते. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना लॅबसाठी भाजपची नेतेमंडळी आग्रही होती. जिल्हा रुग्णालयात ही लॅब सुरू करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. यात 19 जून रोजी जिल्हा रुग्णालयात कोविड-19 लॅब कार्यान्वित केली. त्यानंतर उद्या (ता.9) राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये दुसरी कोविड-19 लॅब कार्यान्वित होणार आहे. या लॅबसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटीचा निधी दिला आहे. आमदार भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार प्रसाद लाड यांनी आमदार निधीतून प्रत्येकी वीस लाख रुपये दिले.
कार्यक्रमास प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते अतुल काळसेकर आदींची उपस्थिती असणार आहे.

संबंधित बातम्या