नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या स्पर्धेत पाकचा नवा कांदा

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

बकरी ईदसाठी बांगलादेश, दुबईसह आखाती देश आणि मलेशियामध्ये मागणीचा अभाव
 

नाशिक

नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा नवा कांदा उतरला आहे. मात्र अजूनही टनाला ५० ते ७५ डॉलर अधिकचा भाव असल्याने पाकिस्तानच्या कांद्याकडे कल वाढलेला नाही. मुळातच, किलोला १७ ते १८ रुपये भाव असताना आयातदारांनी भाव वाढतील म्हणून कांद्याच्या खरेदी मोठ्याप्रमाणात करुन ठेवली. त्यामुळे आता भाव कमी झालेले असतानाही ग्राहक ‘फेस्टीव्हल मूड'मध्ये नसल्याने आयातदार खरेदीकडील हात आखडता घेतला आहे. पाकिस्तान कांद्याचा भाव टनाला ३००, तर नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा भाव २२० ते २२५ डॉलर इतका आहे.
बकरी ईदच्या निमित्ताने बांगलादेश, दुबईसह आखाती देश आणि मलेशियामध्ये पंधरा दिवस अगोदर आयातदारांची मागणी वाढते. सध्यस्थितीत आठवड्याला पाच कंटेनरभर कांद्याची मागणी नोंदवणाऱया आयातदारांना पंधरा दिवसातून एकदा तीन कंटेनरभर कांदा पाठवावा लागतो, असे कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी ‘सकाळ'ला सांगितले. श्री. सिंह म्हणाले, की कोलंबोमध्ये किलोला २४ रुपये या भावाने कांदा पोच होतोय. श्रीलंकेत किलोला पंधरा रुपयांपर्यंत आयात शुल्क आकारले जाते. शिवाय दुबई, सिंगापूर, मलेशियामध्ये ३२ रुपये किलो या भावाने पोच कांदा द्यावा लागतो. जहाजाने श्रीलंका, दुबईचा प्रवास तीन, तर सिंगापूर-मलेशियाचा सात ते आठ दिवसांचा आहे. प्रवास भाड्यावर खर्च अधिक करावा लागतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आयात-निर्यातीवर मर्यादा आल्याने कार्गोसाठी माल उपलब्ध होत नसल्याने आठवड्याला पाच ऐवजी दोन अथवा तीन जहाज मुंबई बंदरातून रवाना होताहेत. त्यातून कांदा पाठवला जात आहे. फळे आणि भाजीपाल्याचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंत असते.
१४-१
पुढचा महिना कठीण काळ
कर्नाटकमध्ये पुढील महिन्याच्या मध्यापासून नवीन कांद्याचे उत्पादन बाजारात यायला सुरवात होते. मग निर्यातदारांचा कल त्या कांद्याकडे वाढतो. त्याचवेळी मध्यप्रदेशामध्ये पंधरा टक्क्यांनी यंदा कांद्याचे उत्पादन अधिक झाले असल्याने पुढील महिना अथवा सप्टेंबरमध्ये मध्यप्रदेशातील कांदा संपेल की नाही? हा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याच्यादृष्टीने पुढचा महिना कठीण काळ असेल. देशात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावल्यास त्याचा फायदा नाशिकच्या कांद्याला होऊ शकतो, असे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. सध्यस्थितीत कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमधून ७०० ते ८०० रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री सुरु आहे. लासलगावमध्ये ७५०, पिंपळगाव बसवंतमध्ये ८०० रुपये क्विंटल असा भाव आज शेतकऱयांना मिळाला. मुंबईत ८५०, औरंगाबादमध्ये ५५०, धुळ्यात ५८०, नागपूरमध्ये ९५०, पुण्यात ७०० रुपये क्विंटल असा भाव राहिला.

६० ते ७० लाख टन कांदा शिल्लक
देशाला महिन्याला १० लाख टन कांदा खाण्यासाठी लागतो. मेपासून सहा महिने उन्हाळ कांदा खाण्यासाठी वापरला जात असल्याने बियाणे आणि खराब होणाऱया कांद्याचे प्रमाण लक्षात घेतले, तरीही ७० ते ८० लाख टन कांदा पुरेसा ठरतो. यंदा देशात १३० लाख टन कांद्याचे उत्पादन झाले असून सध्यस्थितीत ६० ते ७० लाख टन कांदा चाळींमध्ये शिल्लक असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. अशातच, आॅक्टोंबरमध्ये नवीन पोळ कांद्याचे उत्पादन शेतकऱयांच्या हातात असेल.

‘‘दसऱयाच्या पुढे उन्हाळ कांदा राहत नाही. यंदा मात्र तो दीपावलीपर्यंत टिकेल अशी स्थिती आहे. सध्याच्या वातावरणामुळे काही भागातील चाळींमध्ये वास यायला लागला. तरीही पुढील महिन्यापासून कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध कांद्याला चार पैसे मिळण्यासाठी निर्यातवृद्धीकडे लक्ष द्यावे लागेल.
- चांगदेवराव होळकर (माजी अध्यक्ष, नाफेड)

संबंधित बातम्या