वाहनातून थेट पालख्या नेणार

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

पाच वारकऱ्यांना पायी जाण्याची परवानगी द्या, चार मानाच्या पालख्यांनी शासनाकडे मागणी

पंढरपूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेच्या पालखी सोहळ्याविषयी शासनाने अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. तथापी सोहळ्यातील सहा मानाच्या पालख्यांपैकी श्री संत एकनाथ, श्री संत सोपानकाका, श्री संत निवृत्तीनाथ आणि श्री संत मुक्ताबाई या चार संस्थानांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ नये यासाठी केवळ पाच वारकऱ्यांना पायी चालत जाण्याची परवानगी मागितली आहे. तशी परवानगी मिळाली तर पाच वारकरी पायी चालत पंढरपूरकडे जातील आणि शासन जेवढ्या लोकांना परवानगी देईल तेवढ्या लोकांच्या समवेत दशमी दिवशी या चारही ही प्रमुख संतांच्या पादुका वाहनातून थेट पंढरपूर येथे नेल्या जातील. पंढरपुरात शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत आषाढीचा सोहळा साजरा केला जाईल अशाप्रकारची भूमिका आज या चार प्रमुख संस्थांनानी घेतली आहे, अशी माहिती श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठणचे सोहळाप्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी आज सकाळ'शी बोलताना दिली.
कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रेविषयी सध्या संभ्रमावस्था आहे. दरवर्षीप्रमाणे राज्याच्या विविध भागातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरला येणार किंवा नाही याविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान तसेच अन्य काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. कोरोनामुळे यंदा पालखी सोहळा कशा पद्धतीने काढण्यात यावा याविषयी दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी तसेच महसूल, आरोग्य आणि पोलिस अधिकारी यांनी त्या बैठकीत आपापली मते मांडली होती. शासनाने त्यानंतर अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.
दरम्यान सोहळ्यातील सहा मानाच्या पालख्या पैकी श्री संत एकनाथ, श्री संत सोपानकाका, श्री संत निवृत्तीनाथ आणि श्री संत मुक्ताबाई या चार संस्थानांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू नये यासाठी यंदा केवळ पाच वारकऱ्यांना पायी पंढरपूरकडे जाण्याची परवानगी मागितली आहे.

शासनाला सहकार्य करण्याची भूमिका
यासंदर्भात श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठणचे सोहळाप्रमुख रघुनाथबुवा गोसावी सकाळ'शी बोलताना म्हणाले, आम्ही चारही ही संतांच्या सोहळा प्रमुखांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करून निर्णय घेतला आहे. आम्ही चारही संस्थांनानी प्रत्येकी केवळ पाच वारकऱ्यांना पायी चालत पंढरपूरला जाण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे. तशी परवानगी मिळाल्यास पाच वारकरी पायी चालत पंढरपूरला जातील आणि शासनाच्या परवानगीने दशमी दिवशी संस्थांनाचे तीस लोक पादुकासह वाहनाने पंढरपूर येथे येतील. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून यात्रेच्या प्रथेप्रमाणे सर्व सोहळा करून पुन्हा वाहनाने परत जातील. शासनाला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे.

संबंधित बातम्या