पंढरीची वारी आता घरोघरी

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

ज्ञानेश्‍वरी पारायण, हरिपाठाचा लाईव्ह अनुभव

मुंबई

कोरोनाच्या प्रादुर्भावाने या वर्षी पंढरीची वारीही सीमित झाली. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे वारकऱ्यांना पंढरीच्या वारीचा अनुभव घेता येणार नाही. कोरोनाच्या काळात राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे, या हेतूने वारकरी संप्रदायाने या निर्णयाचे स्वागत केले; मात्र तरीही विठ्ठलाच्या भेटीची ओढ वारकऱ्यांमध्ये आहेच. प्रत्यक्षात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची भेट घेता येणार नसली तरीही यंदा "अक्षयवारी'अंतर्गत पंढरीची डिजिटल वारी घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय युवा मंच, अक्षयवारी परिवार आणि महाएनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यामाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, तर श्रीगुरू चैतन्यमहाराज देगलूरकर व श्रीगुरू प्रमोदमहाराज जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
गेल्या काही वर्षांपासून वारीतील इंत्थभूत माहिती डिजिटल स्वरूपात भक्तांपर्यंत पोहचवणारे अक्षयमहाराज भोसले यांनी या वर्षी आपल्या वारकऱ्यांना डिजिटल वारीचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. टाळ, मृदुंग आणि जय जय हरी विठ्ठलाच्या गजरात 20 ते 21 दिवस चालणारे वारकरी यंदा विठ्ठलाच्या ओढीने व्याकूळ होऊ नयेत याकरता विविध डिजिटल कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नियमित हरिपाठ, श्री ज्ञानेश्‍वर पारायण करता येणार आहे. तसेच वारीविषयी माहिती, जुने फोटो, वारीतील बदल याविषयी अक्षयमहाराज भोसले माहिती देणार आहेत. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी अक्षयवारीच्या फेसबुक पेजला आणि त्यांच्या व्हॉट्‌सऍपला (8451822772) भेट द्यावी लागेल.
वारीच्या काळातील पहाटेपासून अगदी संध्याकाळी हरिपाठापर्यंतचा भजनाचा आनंद घेण्यासाठी ऑनलाईन हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. भजनभीष्म प.पू. वै. गुरुवर्य श्रीरामचंद्रबाबा बोधे यांचे पूर्णकृपांकित ह.भ.प. सोपानमहाराज पाहणे (काका) (अध्यापक : सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र आळंदी/पंढरपूर) हे रोज सकाळी गाथा भजनाचा आनंद देतील. वारकरी संप्रदायाच्या भजनातील विशुद्ध व सात्विक परंपरेचा आनंद अक्षयवारीच्या डिजिटल वारी 2020 उपक्रमांतर्गत नियमित घेता येणार आहे. वारीच्या प्रारंभापासून रोज सकाळी 9 वाजता हे हरिपाठ होणार आहे. ज्ञानेश्‍वरी पारायण रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत हे ऑनलाईन होईल. या पारायण सोहळ्याचे नेतृत्व प.पू. श्रीएकनाथमहाराज कोष्टी (गुरुजी) करणार आहेत.

आठवणींना उजाळा
गेल्या काही वर्षांपासून घरबसल्या वारीचा अनुभव मिळावा म्हणून अक्षयवारीमार्फत लोकांना डिजिटल वारीचा आस्वाद देण्यात येत होता. या काळात अनेक फोटो, व्हिडीओ जमा झाले आहेत. हे डिजिटल दस्तावेज पुन्हा लोकांसमोर आणून वारीतील आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. व्हॉट्‌सऍपद्वारे हे फोटो व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

ऑनलाईन संवाद
अनेक क्षेत्रांतील अभ्यासक वारीशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशीही या काळात ऑनलाईन संवाद साधण्यात येणार आहे. तसेच शासकीय निर्बंध पाळत कोरोनावर मात करण्यासाठी कीर्तन, भजन व भारूड या माध्यमातून प्रबोधनाद्वारे प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या