नाधवडेत फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू

Dainik Gomantak
रविवार, 17 मे 2020

नाधवडे पाष्टेवाडी येथील एका पायवाटेवर शिकारीच्या उद्देशाने फासकी लावली होती. त्यात काल (ता.15) रात्री बिबट्या अडकला.

वैभववाडी

नाधवडे पाष्टेवाडी येथे शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी सव्वा-आठच्या सुमारास उजेडात आला. 
नाधवडे पाष्टेवाडी येथील एका पायवाटेवर शिकारीच्या उद्देशाने फासकी लावली होती. त्यात काल (ता.15) रात्री बिबट्या अडकला. बिबट्याचा मागील भाग फासकीत अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. दरम्यान, आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास काही स्थानिकांनी फासकीत बिबट्या अडकल्याचे पाहिले. ही माहिती त्यांनी वनविभागाला दिल्यानंतर कणकवलीचे वनक्षेत्रपाल एस. बी. सोनवडेकर, वनपाल एस. एस. वाघरे, वनरक्षक ए. एच. काकतीकर, पी. डी. पाटील, के. जी. पाटील आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केल्यानंतर बिबट्या मृत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी बिबट्याला फासकीतून बाहेर काढले. साधारणपणे अडीच ते तीन वर्षांचा पूर्णवाढ झालेला बिबट्या होता. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून बिबट्याला शवविच्छेदन करण्यासाठी कणकवलीला नेले.

फासकी नेमकी लावली कोणी?
ज्या जमिनीत फासकी लावण्यात आली होती, ती जमीन राजापूर तालुक्‍यातील एका व्यक्तीची आहे. त्यामुळे फासकी नेमकी कुणी आणि कधी लावली, याचा शोध अद्याप लागलेला नाही.

संबंधित बातम्या