माळवाशीत खोल विहिरीत कोसळला बिबट्या

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

वनविभागामुळे अधिवासात सुखरूप रवाना

देवरूख

सावजाचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला विहिरीचा अंदाज न आल्याने तो थेट 40 फूट खोल विहिरीत कोसळला. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने त्याला जीवदान दिले. त्याला रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. हा प्रकार काल (सोमवारी) संध्याकाळी नजीकच्या माळवाशी येथे घडला.
देवरूखजवळच्या माळवाशी येथे रत्नागिरी मार्गाजवळ संदीप चाळके यांचे "हिल पॉइंट' हॉटेल आहे. त्याजवळ मोठी विहीर आहे. याच विहिरीवरील पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी संतोष जाधव जातात. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ते पंप सुरू करण्यासाठी गेले होते. तेंव्हा त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.
त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आर. सी. भवर, परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, संतोष कदम, शर्वरी कदम, दिनेश गुरव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत विहिरीजवळ बघ्यांची गर्दी जमली होती. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने विहिरीत जाळी टाकून बिबट्याला काठावर आणले. यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.
बिबट्या एक वर्षाची मादी असल्याचे सांगण्यात आले. विहिरीत पडल्यानंतरही तिला कोणतीही इजा झाली नव्हती. रात्री उशिरा तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

संबंधित बातम्या