मुंबईत रुग्णवाढीच्या दरात वाढ

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

8 विभागांत सर्वाधिक रुग्णवाढ; पालिकेचे शर्थीचे प्रयत्न

मुंबई

मुंबईत कोव्हिड 19 संसर्ग वेगाने आपले हातपाय पसरत असून रुग्णांची संख्या 30 हजार पार झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर हादेखील वाढला असून तो 6.61 इतका झाला आहे. हा दर कमी करण्यासाठी पालिकेने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबईत पालिकेचे 24 वॉर्ड असून त्यातील 8 वॉर्डमधील रुग्णवाढीचा दैनंदिन दर हा आठ टक्‍क्‍यांच्या वर आहे. आर दक्षिण 9.4, आर मध्य 8.9 , टी 11.9 , पी दक्षिण 10.9, पी उत्तर 11.9 , एस 10.0, एन 13.7, एफ दक्षिण 8.2 या विभागांचा यात समावेश आहे; तर 16 वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा सरासरी दर हा आठ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. जी दक्षिण 3.4 टक्के, ई 4.2 टक्के, एफ उत्तर 4.6 टक्के आणि डी 4.6 टक्के या चार वॉर्डमधील रुग्णवाढीचा दर हा सर्वाधिक कमी आहे.
मुंबईतील कोव्हिड 19 रुग्णांचा विभागवार आढावा पालिकेने सुरू केला आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये कोव्हिड 19 रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीसमवेत रुग्णवाढीच्या सरासरी दरावरदेखील लक्ष ठेवले जात आहे.
रुग्णवाढीच्या सरासरी दरामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या एखाद्या विशिष्ट विभागामध्ये रुग्णांची वाढ होऊ लागल्यास त्याची तातडीने दखल घेण्यास मदत होते.
या निकषांनुसार रुग्णवाढीचा दर आठ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अथवा कमी अशा गटांमध्ये विभागांचे वर्गीकरण केले जाते. विशिष्ट विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर आठ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आढळून आल्यास तेथे प्रतिबंधित क्षेत्राचे कठोरपणे पालन करणे, सुरक्षित अंतर राखण्यासाठी नागरी समुदायाकडून अधिकाधिक सहभाग मिळवणे यासाठी कार्यवाही केली जाते.

कोव्हिड 19 रुग्णवाढीच्या दराविषयी
प्रत्येक विभागामध्ये मागील सात दिवसांत आढळून आलेल्या रुग्णाची संख्या एकत्र करून, त्या विभागाची सरासरी दैनंदिन रुग्णवाढ संख्या नोंद केली जाते. विशिष्ट विभागामध्ये प्रतिदिन रुग्णवाढीचा दर म्हणजे मागील दिवसाच्या तुलनेत त्या विभागात झालेल्या एकूण रुग्णवाढीची टक्केवारी काढली जाते. याच पद्धतीने सर्व विभागांमध्ये वाढलेल्या एकूण रुग्णांची संख्या विचारात घेऊन सर्वसाधारण रुग्णवाढीचा दर गणला जातो. मुंबईसाठी, दिनांक 16 मे 2020 ते 22 मे 2020 या कालावधी मध्ये कोव्हिड 19 वाढीचा सर्वसाधारण सरासरी दर हा 6.61 टक्के इतका आहे.

संबंधित बातम्या