120 वर्षांपूर्वी प्लेगवर मात; आता कोविडचा शिरकाव

समीर सुर्वे
मंगळवार, 21 जुलै 2020

बीआयटी चाळीत रुग्णसंख्या वाढती; आतापर्यंत 511 बाधित

मुंबई

 120 वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीनंतर मुंबईतील गलिच्छ वस्ती निर्मूलनासाठी बीआयटी चाळी उभारण्यात आल्या होत्या; मात्र आता या चाळींमध्येच कोविडचा शिरकाव झाला आहे. ई प्रभागातील माझगाव येथील संत मेरी मार्गावरील 12 नंबरच्या बीआयटी चाळीत तब्बल 76 रुग्ण आढळले आहेत.
1896 मध्ये मुंबईत प्लेगची साथ पसरली होती. त्यानंतर शहरात साथीचे आजार पसरू नये म्हणून बीआयटी चाळी बांधण्यात आल्या. पूर्वी मुंबईत बंगले नव्हते. झोपड्यांसारखी घरे होती; मात्र चाळी बांधण्याची सुरवात खऱ्या अर्थाने प्लेगच्या साथीनंतर झाली; मात्र या बीआयटी चाळी आणि त्यांच्या परिसरात आतापर्यंत 511 कोविड रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई सेंट्रल, चिराबाजार, परळ बीआयटी या चाळीतील कोविड रुग्णांची संख्या 8 दिवसांत काहीशी वाढली आहे.
मुंबई सेंट्रल बेलासिर मार्गावरील बीआयटी संकुल आणि परिसरात 9 जुलै रोजी 41 रुग्ण होते; तर 17 जुलै रोजी 45 रुग्ण नोंदवले आहेत. परळ येथील बीआयटी चाळींमध्ये 54 रुग्ण झाले आहेत; तर चिराबाजार येथील बीआयटी चाळ आणि परिसरात 73 रुग्ण होते ते 76 झाले आहेत. आग्रीपाडा बीआयटी चाळींमध्ये 97 रुग्ण आढळले आहेत. माझगाव संत मेरी मार्गावरील बीआयटी चाळींमध्ये 127 रुग्ण आढळले आहेत. त्यात एका 12 नंबरच्या चाळीत 76 रुग्ण आहेत. वाडीबंदर माझगाव बीआयटी परिसरात 83 आणि कामाठीपुरा बीआयटी 49 रुग्ण आढळले आहेत; तर भायखळा बीआयटी चाळी आणि परिसरात 64 रुग्ण आढळले आहेत.

प्लेगने आणली भाड्याच्या घरांची संस्कृती
प्ले
गच्या साथीच्या काळात 1898 मध्ये ब्रिटीश संसदेत कायदा मंजूर करून मुंबईच्या विकासासाठी बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या शिफारशीनुसार शिवडी, माझगावपर्यंत असलेले शहर दादर, माटुंगा शिवपर्यंत वाढविण्यात आले. या ट्रस्टनेच बीआयटी चाळींची उभारणा केली. दक्षिण आणि मध्य मुंबईत या चाळी असून मुंबईत येणाऱ्या कामगारांना भाड्यांची घरे या चाळीत मिळत होती. 120 वर्षांपूर्वीची ही सरकारने राबवलेली "रेंटल हाऊसिंग' सिस्टिम होती. कालांतराने बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट मुंबई महापालिकेत विलीन झाली.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या