संबंधित बातम्या
पणजी- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना नुकतीच राष्ट्रीय तपास...


मुंबई: तत्कालीन फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उसळलेल्या कोरेगाव - भीमा दंगल प्रकरणाची...


भीमा कोरेगाव प्रकरण
तब्येत ढासळली; नियमित तपासणी होत नसल्याचा आरोप
मुंबई
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले लेखक, कवी वरवरा राव (81) यांनी जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने राव यांचा जामीन अर्ज नुकताच नामंजूर केला आहे. या निर्णयाविरोधात राव यांनी ऍड. आर. सत्यनारायणन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. राव यांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली असून त्यांना सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. वयोवृद्ध असून त्यांना विविध आजार आहेत. कोरोनाचा धोका कारागृहात अधिक आहे. त्यामुळे तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारागृह प्रशासन राव यांची नियमित वैद्यकीय तपासणी करीत नाही. त्यामुळे त्यांची तपासणीही करण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या वतीने करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास स्वखर्चाने खासगी रुग्णालयात तपासणीची तयारीही राव यांनी दर्शविली आहे. शनिवारी त्यांनी कुटुंबीयांना फोनवरून तब्येत ठीक नसल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच चक्कर येऊन कोसळले
वरवरा राव काही दिवसांपूर्वीच कारागृहात चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी, योग्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी काही खासदार आणि कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. याप्रकरणी राव यांच्यासह प्रा. सोमा सेन (61) यांचा जामीन अर्जही विशेष न्यायालयाने नामंजूर केला आहे.
गौतम नवलखा यांनाही दिलासा नाही
दरम्यान, याप्रकरणी अन्य एक आरोपी विचारवंत गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज रविवारी विशेष न्यायालयाने नामंजूर केला. एनआयएने 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी अर्जामध्ये केली होती; मात्र सध्याच्या परिस्थितीत आरोपपत्र दाखल करता आले नाही, असे एनआयएकडून सांगण्यात आले. नवलखा यांना आणखी दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, आरोपपत्र दाखल करण्यासाठी नव्वद दिवसांचा अवधीही तपास यंत्रणेला मंजूर केला. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अकरा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.