महाराष्ट्रात पोल्ट्री उद्योग सावरण्याच्या वाटेवर

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी देशभरातील खवय्ये आठवड्याला दीड लाख टन चिकन फस्त करत होते. कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्यावर मार्चमध्ये चिकनचा खप जेमतेम 40 हजार टनांवर आला.

मुंबई

कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आणि चिकन खाण्याबाबतची भीती यामुळे पोल्ट्री उद्योगाला मागील काही महिन्यांत 1600 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यातून सावरू लागलेला हा उद्योग पूर्ववत होण्यासाठी तीन ते सहा महिने लागतील, असे सांगण्यात आले. 
कोव्हिड-19  विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेले चिकन खाण्याची लोकांना भीती वाटत होती. ही भीती निराधार असल्याचे स्पष्ट झाल्यावर आता खवय्ये चिकनकडे वळू लागले आहेत. त्यामुळे कमी झालेली विक्री पुन्हा वाढू लागली आहे; परंतु चिकन विक्री पूर्ववत होण्यास तीन ते सहा महिने लागतील. या काळात दरांमध्ये फारशी वाढ होणार नाही, असे सगुणा फुड्‌सचे महाव्यवस्थापक रवींद्र बाबू यांनी सांगितले. 
कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी देशभरातील खवय्ये आठवड्याला दीड लाख टन चिकन फस्त करत होते. कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्यावर मार्चमध्ये चिकनचा खप जेमतेम 40 हजार टनांवर आला. आता त्यात सुधारणा होऊन चिकनचा खप आठवड्याला 70 हजार टन झाला आहे. तो पूर्ववत होण्यास तीन ते सहा महिने लागतील, असे ते म्हणाले.
चिकनमुळे कोरोना होत नाही, हे लोकांना कळले आहे. मध्यंतरी चिकनचा खप घसरल्यावर अनेक शेतकऱ्यांनी पोल्ट्री फार्म बंद केले, अनेकांनी कोंबड्या-अंडी लोकांना फुकट वाटली किंवा नष्ट केली. आता पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा भरात येण्यास काही काळ लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
आता चिकनची मागणी व पुरवठा सारख्याच गतीने वाढत आहे. आगामी काळात चिकनची टंचाई किंवा दरवाढ होणार नाही. देशातील 50 ते 60 पोल्ट्री व्यवसाय शेतकरी वैयक्तिकरित्या करतात, तर उर्वरित व्यवसाय उद्योजक-व्यावसायिकांच्या ताब्यात आहे. मधल्या काळात या साऱ्यांना मिळून 1600 कोटींचा तोटा झाल्याचा अंदाज असल्याचे रवींद्र बाबू म्हणाले. 
 
दोन किलोपर्यंतची कोंबडी उत्तम
चिकनचा समावेश आहारात केल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारते. शरीर कमावण्यासाठीही चिकन उत्तम अन्न आहे. कोंबड्या 38 ते 42 आठवड्यांच्या झाल्यावर पावणेदोन ते दोन किलो वजन होते. याच वेळी पोषणमूल्य, मऊपणा, चव या दृष्टीने चिकन सर्वोत्तम असते. त्यामुळे खवय्यांनी पावणेदोन ते दोन किलो वजनाची जिवंत कोंबडी घ्यावी, असा सल्ला रवींद्र बाबू यांनी दिला.

संबंधित बातम्या