मॉन्सूनची सिंधुदुर्गात दमदार सलामी

Dainik Gomantak
शनिवार, 13 जून 2020

करूळ घाटात पडझड; दिवसभर काढले झोडपून

वैभववाडी

जिल्ह्यात मॉन्सूनने आज दमदार सलामी दिली. संपूर्ण जिल्ह्याला सकाळपासून मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. पहिल्याच दिवशी मॉन्सूनने जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती केली. पावसामुळे बहुतांशी नदी नाले प्रवाहित झाले आहेत. आतापर्यत कोरडे ठाक असलेल्या शेतमळ्यातून पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. संततधारेमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले. करूळ घाटात दगड रस्त्यावर आले; परंतु वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
लांबलेल्या मॉन्सूनचे अखेर जिल्ह्यात काल (ता. 11) सायंकाळी उशिरा आगमन झाले. रात्री उशिरा पावसाचा जोर वाढला. त्यानंतर आज सकाळपासून मॉन्सून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धडकला. सकाळपासून संततधार सुरू झाली. पावसाने अक्षरक्षः जिल्ह्याला झोडपून काढले. शेतकऱ्यांना शेतीची कामे थांबवावी लागली. पहिल्याच दिवशी जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नदीनाले प्रवाहित झाले असून त्यातील अधिकतर पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. सकाळी सहापासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी चारपर्यत अखंडपणे बरसत होता. पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. 
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस पडत होता. त्याच पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. पूर्व पावसात खंड पडेल, अशी शक्‍यता होती. त्यातच मॉन्सून लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही अंशी चिंता होती; परंतु आजच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
जिल्ह्यात 1 जूनपासून पावसाचे आगमन झाले आहे. आतापर्यंत सरासरी 363.275 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात पावसाचा जोर वाढला असून सरासरी 74.875 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासात मालवण तालुक्‍यात सर्वाधिक 158 मिलिमीटर एवढा पाऊस पडला. तालुकानिहाय पाऊस असा ः (कंसात आजअखेरचा पाऊस मिलिमीटरमध्ये) दोडामार्ग 14 (294), सावंतवाडी 63 (340), वेंगुर्ले 88 (427. 2), कुडाळ 70(297), मालवण 58 (510), कणकवली 32 (222), देवगड 140 (473), वैभववाडी 34 (337) मिलिमीटर.

 

 

संबंधित बातम्या