संघाच्या कार्यक्रमात प्रणवदांचे बौद्धिक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

‘‘कोणत्याही प्रकारची कट्टरता तसेच धर्म वा असहिष्णुतेच्या भावनेवर आधारित राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास आपले देश म्हणून असलेले अस्तित्वच धोक्‍यात येईल,’’ असा इशारा प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून दिला होता.

नागपूर: ७ जून २०१८ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित करण्यात आले होते. ते संघाच्या कार्यक्रमाला येणार म्हणून मोठा वादंग निर्माण झाला होता. संघाचे निमंत्रण स्वीकारल्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर उमटला होता. मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी पत्र पाठवून फेरविचाराचा सल्ला दिला होता. त्यावर नागपुरातच भूमिका मांडू, असे ते म्हणाले होते.

‘‘कोणत्याही प्रकारची कट्टरता तसेच धर्म वा असहिष्णुतेच्या भावनेवर आधारित राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास आपले देश म्हणून असलेले अस्तित्वच धोक्‍यात येईल,’’ असा इशारा त्यांनी संघाच्या व्यासपीठावरून दिला होता. विविध मुद्द्यांवरील हिंसक प्रतिक्रियांमुळे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे भय आणि अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून संवादाचे सर्व मार्ग अनुसरून देशाला बाहेर काढले तरच संपूर्ण समाज लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल, असे त्यांनी म्हटले होते. 

मुखर्जी यांच्यासाठी संघाने सोहळ्यामधील परंपरा बाजूला ठेवली. संघाच्या परंपरेनुसार प्रमुख पाहुण्यांचे भाषण पहिले होते आणि शेवटी सरसंघचालकांचे. मात्र, ही परंपरा बाजूला ठेवत सरसंघचालकांनी पहिले भाषण केले. मुखर्जी यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला होता. महाल परिसरातील शिर्के गल्लीतील डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानालाही त्यांनी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी संघकार्याची माहिती जाणून घेतली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या