बापरे..!; आटपाडीच्या बाजारात आलेल्या 'मोदी' बकऱ्याची किंमत दीड कोटी रूपये...

दैनिक गोमंतक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

 दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा भरते. यावर्षी कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन शेळ्या-मेंढ्यांचा बाजार दोन दिवस भरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आटपाडी- कोरोनामुळे यावर्षी कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली. याला पर्याय म्हणून शेळ्यांचा आणि मेंढ्यांचा बाजार भरवण्यात आला. यात असे काही घडले की यामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला. या बाजारात सांगोल्याचे शेतकरी बाबुराव मिटकरी यांच्या 'मोदी' नावाच्या बकऱ्याला तब्बल 70 लाखांची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी या बकऱ्याची किंमत दीड कोटी रूपये इतकी सांगितली आहे.   

 दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा भरते. यावर्षी कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन शेळ्या-मेंढ्यांचा बाजार दोन दिवस भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात रविवारी पहिल्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरला. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, विजापूर या भागातील मेंढपाळ जातिवंत बकरे आणि मेंढ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. त्याच्या खरेदीसाठी हौशी मेंढपाळही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. 

या बाजारामध्ये सांगोला तालुक्‍यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांनी आणलेला मोदी बकरा सर्वाधिक आकर्षक ठरला. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या बकऱ्याला सुरवातीला 70 लाखांची मागणी नोंदवली आहे. मात्र, मिटकरी यांनी याची किंमत दीड कोटी सांगितली आहे. या बकऱ्याच्या मागणीचा किमतीत वाढ होत चालली आहे. याशिवाय या "मोदी'चे लहान पिल्लू असलेल्या या सोमनाथ जाधव यांच्या दोन महिन्यांच्या मेंढीला 14 लाखांची मागणी केली आहे. बाजारामध्ये एक लाखापासून दोन, चार, सहा, दहा-बारा लाखांपर्यंत बकऱ्यांना मागणी होत होती. बाजारात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदीसाठी पुणे, गोवा, कोल्हापूर, सांगली येथून मोठ्या संख्येने व्यापारी आले होते. 

का दिलं मोदींचं नाव?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जगात नावलौकिक मिळवला आहे. म्हणूनच ते आमचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांचेच नाव या बकऱ्याला देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आमच्या या जातिवंत बकऱ्याचाही मोठा नावलौकिक झाला आहे. तो आमचा जीव की प्राण आहे. जतच्या व्यापाऱ्याने 70 लाखापर्यंत मागणी केली आहे. मात्र, आम्ही दीड कोटी रुपये किंमत सांगितली आहे. अनेकजण सांगतात, भरपूर किंमत झाली, विकून टाका. परंतु, आम्ही तो विकणार नाही. कारण याच्यापासून होणाऱ्या पिल्लांची दहा ते पंधरा लाखापर्यंत विक्री होते, असे बाबुराव मेटकरी यांनी सांगितले. हे जातिवंत बकरे कापण्यासाठी नाही, तर प्रजोत्पदानासाठी आणि नव्या संकरित जाती विकसीत करण्यासाठी उपयोगात आणले जातात, असे तज्ञांचे मत आहे.

संबंधित बातम्या