अलगीकरण कक्षातील वॉर्डबॉयला चोपले

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

कोल्हापूर विद्यापीठात प्रकार; मुलीशी असभ्य वर्तन

कोल्हापूर

अलगीकरण कक्षातील अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याच्या रागातून वॉर्डबॉयला आज नातेवाईकांनी चोप दिला. शिवाजी विद्यापीठातील डीओटी विभागात सायंकाळी हा प्रकार घडला. तसे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. वॉर्डबॉय सोमेश्‍वर सतीश कासे (वय 21, रा. पन्हाळा) याच्या विरोधात रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती ः शिवाजी विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजी (डीओटी) विभाग आहे. तेथे कोरोना संसर्ग उपचारअंतर्गत अलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात एक अल्पवयीन मुलगी 17 जुलैला दाखल झाली होती. येथे कंत्राटी पद्धतीने वॉर्डबॉय नेमण्यात आले आहेत. त्यात सोमेश्‍वरचा समावेश आहे. येथील परिचारिकेने सायंकाळी संबंधित मुलीला औषधे दिली. त्यानंतर ती निघून गेली. यानंतर सोमेश्‍वर तिच्याजवळ गेला. त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. त्या मुलीने घडलेला प्रकार फोनवरून आपल्या नातेवाईकांना सांगितला. तसे तिचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी थेट या अलगीकरण कक्षात धाव घेतली. त्यांनी सोमेश्‍वरला चोप देण्यास सुरवात केली. थेट अलगीकरण कक्षाबाहेर घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित वॉर्डबॉयला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी तातडीने तपास सुरू केला.

शहरवासीयांतून नाराजी
कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येक जण करत आहे. त्यासाठी पुन्हा लॉकडाउन केले आहे. दुसरीकडे अलगीकरण कक्षात असभ्य वर्तनाचा प्रकार घडल्याने शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या