गुळदुवेत क्वारंटाईन तरुणाचा मृत्यू

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

मुंबईतून आलेला; मळेवाड आरोग्य केंद्रही "सील'

मळेवाड

मालाडहून (मुंबई) गुळदुवे (ता. सावंतवाडी) येथे आलेला आणि संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या तरुणाचा आज सकाळी अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. उशिरापर्यंत मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या तरुणाची तपासणी झालेले मळेवाड आरोग्य केंद्र आज तातडीने बंद करण्यात आले.
संबंधित तरुण मालाडहून भाडेतत्त्वावरील गाडी करून गुळदुवेत आला होता. तो कुटुंबासमवेत होता. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला गुळदुवे येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. पत्नी व मुलगाही क्वारंटाईन आहे. आज सकाळी अचानक त्याला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला तातडीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून स्पष्ट झाले नाही; मात्र त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. त्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
संबंधित तरुण मुंबईहून आल्यानंतर तपासणीसाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता. यामुळे आज आरोग्य केंद्रही बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदिती ठाकूर यांना दिल्या. आरोग्य केंद्र पूर्णपणे निर्जंतुक करण्याचाही सूचना असल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर तातडीने आरोग्य केंद्राची दोन्ही गेट बंद करण्यात आली. या कुटुंबाला घेऊन गाडी चालकाशीही प्रशासन संपर्क करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
स्वॅब घेतल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. यानंतर अंत्यविधी करण्यात आले. या घटनेनंतर मृताच्या अती जोखमीतील संपर्कामधील सहा व्यक्तींना सावंतवाडी येथे क्वारंटाईन केल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

संबंधित बातम्या