विजांच्या लखलखाटांसह रत्नागिरीत पाऊस

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

नद्यांना पूर; पंधरवड्यातच सरासरीपेक्षा 20 टक्के पाऊस
 

रत्नागिरी

विजांच्या कडकडाटासह आज जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून पुराची शक्‍यता निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच एकूण वार्षिक सरासरीच्या 20 टक्के पाऊस पडला आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गासह ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले; मात्र जीवितहानी झालेली नाही.
गुरुवारी (ता. 18) सकाळी 24 तासांत जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद 112.78 मिलिमीटर झाली. एक जूनपासून आतापर्यंत 618 मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस जिल्ह्याच्या दक्षिण पट्ट्यात झाला आहे. राजापूर तालुक्‍यात 190, लांजा- 146, रत्नागिरी- 139, संगमेश्‍वर- 105 मिलिमीटरची नोंद झाली. उर्वरित तालुक्‍यामध्ये मंडणगड- 74, दापोली- 130, खेड- 70, गुहागर- 88, चिपळूण- 73 मिलिमीटर पाऊस झाला. अरबी समुद्रात चक्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गुरुवारी दिवसभरात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्‍यता होती. त्यानुसार पहाटेपासूनच पावसाला सुरवात झाली होती. तासागणिक पावसाचा जोर वाढत होता. विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्यांनी अक्षरशः झोडपून काढले. दापोली येथे पिसई गावाजवळ झाड पडल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. संगमेश्‍वर तालुक्‍यात घरांवर झाडे पडून सुमारे चार लाख रुपयांच्या नुकसानीची नोंद झाली. संगमेश्‍वर तालुक्‍यात तुरळ येथे सांस्कृतिक केंद्राच्या छताचे पत्रे उडून गेले असून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. किरडुवे येथील अनंत विठ्ठल पांचाळ यांच्या घरावर झाड पडून सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्‍यात आरे येथे संजय महादेव आरेकर यांच्या पडवीचे अंशतः नुकसान झाले. राजापूर तालुक्‍यात मोघे येथील एकनाथ विष्णू मिरगुडे यांच्या पडवीचे आणि नाटे येथील श्रीधर चव्हाण यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या