धूमस्टाईल बायकर्समुळे रत्नागिरीकर हैराण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात धूमस्टाईल आणि चित्रविचित्र, भयंकर आवाज काढणाऱ्या बाईकवाल्यांनी मुले, स्त्रिया, वृद्ध, रुग्ण अशा सर्वांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. या यमदुतांमध्ये शाळकरी, कॉलेजच्या मुलांचा जास्त भरणा आहे.

रत्नागिरी : चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात धूमस्टाईल आणि चित्रविचित्र, भयंकर आवाज काढणाऱ्या बाईकवाल्यांनी मुले, स्त्रिया, वृद्ध, रुग्ण अशा सर्वांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. या यमदुतांमध्ये शाळकरी, कॉलेजच्या मुलांचा जास्त भरणा आहे. हे यमदूतच आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. परंतु या धूमचालकांवर कारवाई केली जात नाही.

गेल्या काही दिवसांपासून अशा मस्तवाल बाईकस्वारांना पोलिसांनी वठणीवर आणावे, अशी मागणी करीत आहोत. पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तसे आश्‍वासन दिले आहे; मात्र त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या धूमचालकांच्या गाड्यांचे नंबर देण्यास नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. ज्यांना स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी आहे अशा जागृत नागरिकांनी असे नंबर्स पोलिसांना द्यावेत आणि त्यावर पोलिस पडताळणी करून कारवाई करतील,असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  

धूमचालक नेहमीच सायलेन्सरमध्ये फेरफार करतात व धूमस्टाईलने वाहने चालवतात. रत्नागिरी व चिपळूणसह शहरी भागांमध्ये असे धूमचालक बरेच आहेत. याबाबत चिपळुणचे पत्रकार मकरंद भागवत यांनी सोशल मीडियावरून जाहीर आवाहनही केले आहे. पोलिसांनीही साध्या वेशातील पोलिसांचे भरारी पथक नेमावे जेणेकरून असे धूमचालक नक्कीच लवकर सापडतील, अशी अपेक्षाही भागवत यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

संबंधित बातम्या