सुशांतसिंहच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच

Dainik Gomantak
बुधवार, 17 जून 2020

पोलिसांनी नोंदवले नऊ जणांचे जबाब

मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे गूढ वाढले असून, पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यापूर्वी सुशांतच्या माजी व्यवस्थापक तरुणीसह आणखी दोन मित्रांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याबाबतही पोलिस पडताळणी करत आहेत.
सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर पोलिसांना त्याच्या खोलीत सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप उलगडलेले नाही. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एका अभिनेत्यासह नऊ जणांचे जबाब नोंदवले आहेत. अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या सुशांतसिंह राजपूतने रविवारी सकाळी वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलीवूडमधील कलाकार, राजकीय नेते, खेळाडू आणि अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी त्याला समाज माध्यमांवरून श्रद्धांजली वाहिली. 
सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे समजलेले नाही. काही जणांनी तर त्यामागे कट असल्याचा संशयही व्यक्त केला होता; मात्र शवविच्छेदन अहवालात सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या पार्थिवावर सोमवारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
सुशांतने आत्महत्या केली त्या दिवशीच्या दिनक्रमाबाबत सहा जणांकडून माहिती घेण्यात आली. सुशांत रविवारी सकाळी साडेसहा वाजता उठला. सकाळी 9 वाजता ज्यूस पिऊन त्याने साडेनऊच्या सुमारास बहिणीला दूरध्वनी केला होता. साडेदहाच्या वाजता तो पुन्हा खोलीत गेला आणि बाहेर आलाच नाही. त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास नोकराने दाराबाहेरून त्याला जेवणासाठी विचारले. त्यावेळी त्याच्या खोलीतून कोणतेही उत्तर आले नाही. 
दुपारचे 12 वाजले, तरी सुशांत खोलीबाहेर आला नाही. त्यामुळे नोकर त्याला उठवण्यासाठी गेला; मात्र खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या नोकराने सुशांतसोबत राहणारा मित्र सिद्धार्थ याला सांगितले. आर्टिस्ट असलेल्या सिद्धार्थने सुशांतशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र फोन प्रतिसाद मिळाला नाही. सिद्धार्थने गोरेगाव येथे राहणाऱ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली आणि चावीवाल्याला बोलावले. चावीवाल्याने बनावट चावी तयार करून दरवाजा उघडल्यानंतर सुशांतने गळफास घेतल्याचे आढळले. 

व्यवस्थापक, दोन मित्रांचीही आत्महत्या?
पोलिसांनी सुशांतसिंहची बहीण, दोन व्यवस्थापक, एक स्वयंपाकी, चावीवाला आणि जवळचा मित्र महेश शेट्टी यांच्याशी बोलून घटनाक्रम समजावून घेतला. त्यातून कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन व अन्य दोन मित्रांनीही आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबाबत पोलिस पडताळणी करत आहेत.

संबंधित बातम्या