रिमूव्ह चायनीज ॲप्सचा होतोय बोलबाला

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

 १३ दिवसांत दहा लाखांहून अधिक युजर्सनी केले डाऊनलोड

सुषेन जाधव

औरंगाबाद

लॉकडाउन आणि चायनीज उत्पादने यांचा संबंध लावला तर टिकटॉक मोबाईल ॲपपासून ते सर्वच चायनीज वस्तूंवर बॅन आणण्याच्या हालचाली आणि त्यासंदर्भातील सोशल मीडियावरील चर्चेला ऊत आलेला आहे. इंटरनेटचा वापर करून लॉकडाउनच्या काळात जे बदल होत आहेत ते आता ऐतिहासिकच ठरतील, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे. याचाच एक भाग म्हणजे रिमूव्ह चायनीज ॲप्स हा होय. आपल्या मोबाईलमधील सर्व चायनीज ॲप्सला क्षणात उडवून टाकणारे ‘वन टच’ या भारतीय ॲप्स डेव्हलपर्सने तयार केलेले हे ॲप अवघ्या तेरा दिवसांतच तब्बल १३ लाखांहून अधिक युजर्सनी डाऊनलोड केले आहे.
लॉकडाउनच्या काळात चायनीज ॲप्ससोबतच इतरही चायनीज उत्पादने न वापरण्याकडे जास्तीत जास्त कल आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास काही सेलिब्रिटींनीही टिकटॉकसारखे ॲप अनइन्स्टॉल केल्याचे मागच्या आठवड्यात समोर आले होते.

‘आत्मनिर्भर बनो’ला असाही प्रतिसाद

१४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर बनो’चे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत रिमूव्ह चायनीज ॲप्ससाठी ‘वन टच’ या भारतीय ॲपची निर्मिती केली असून तसा संदर्भही वन टचतर्फे देण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अवघ्या तीनच दिवसांत म्हणजे १७ मे रोजी या ॲपचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. वन टचने ‘रिमूव्ह चायना ॲप्स’ हे पहिल्या टप्प्यात शैक्षणिक उद्देशासाठी बनविले होते. मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यातील अद्ययावतीकरणाकडे पाऊल टाकले आहे. #BoycottMadeINChina या हॅशटॅगखाली ट्विटरवर राबविण्यात आलेल्या मोहिमेत जवळपास ५८ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

ॲप्स असे करते कार्य

रिमूव्ह चायनीज ॲप्स हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईलमधील जवळपास सर्वच चायनीज बनावटीची मोबाईल ॲप्स सर्च करते आणि त्यानंतर एकेक डिलीट (अनइन्स्टॉल) होतात. मात्र रुट नसलेले किंवा मोबाईलमध्ये बायडिफॉल्ट असलेले चायनीज ॲप्स डिलीट होत नाहीत. या संकल्पनेला तांत्रिक भाषेत ब्लोटवेअर अर्थात प्रिइन्स्टॉल्ड ॲप्स असेही म्हणतात. वेब डेव्हलपर्स प्रदीप तांबे यांच्या मते, या ॲप्सची निर्मिती आणि त्यातील अद्ययावतीकरण पाहता भविष्यात असेही ॲप्स अनइन्स्टॉल होतील.

मुळात कोणत्याही ॲप्सद्वारे गुगलला महसूलच मिळत असतो; मात्र ‘वन टच’ने निर्मिती केलेल्या रिमूव्ह चायना ॲप्सद्वारे एका ठराविक देशाला टारगेट केले आहे, असे दिसते. त्यामुळे भविष्यात वन टचच्या या संबंधित ॲप्सवर गुगलकडून बॅनही आणले जाऊ शकते. कोरोना व्हायरस आणि त्याबद्दलच्या वादाच्या अनुषंगाने भारतीयांकडून या ॲप्सकडे एक इनिशिएटिव्ह म्हणून बघायला हवे.
- प्रदीप तांबे, ॲप्स डेव्हलपर्स

संबंधित बातम्या