निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे निधन

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

साखर कारखान्याची झोनबंदी उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांचाच होता. या निर्णयामुळे शेतकरी आपल्या उसाला भाव मिळेल त्या ठिकाणी ऊस विकू लागला.

औरंगाबाद

सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभीमराव नरसिंगराव देशमुख (बी.एन.) (वय ८५) यांचे शुक्रवारी (ता. २९) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मध्यवर्ती जकात नाका, एन- ६ स्मशानभूमीत दुपारी साडेअकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील बी. एन. देशमुख तथा तात्यासाहेब यांचे १९६५ मध्ये ‘एलएलबी’चे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन डिप्लोमा इन इंटरनॅशनल लॉचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईत बॅ. रामराव आदिक यांच्याकडे कनिष्ठ वकील म्हणून काम केले. हे करतानाच त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीत झोकून दिले. शेकापचे नेते माजी खासदार उद्धवराव पाटील यांचे ते भाचे होत. १९७८ ते १९८४ दरम्यान ते विधानपरिषदेचे आमदार झाले. औरंगाबाद येथे खंडपीठ व्हावे, यासाठीच्या चळवळीत ते अग्रभागी होते. औरंगाबादला खंडपीठाची स्थापना झाल्यानंतर मुंबईची वकिली सोडून ते औरंगाबादला आले आणि खंडपीठात वकिली सुरू केली. १९८६ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. त्यांनी आपल्या सेवाकाळात शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय दिले. साखर कारखान्याची झोनबंदी उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांचाच होता. या निर्णयामुळे शेतकरी आपल्या उसाला भाव मिळेल त्या ठिकाणी ऊस विकू लागला. न्या. बी. एन. देशमुख १९९७ मध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून ते औरंगाबादेत वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही काही काळ वकिली केली.

संबंधित बातम्या