एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

सुरुवातीला अमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचा दावा करणाऱ्या रियाने अखेर चौकशीदरम्यान ड्रग्ज सेवनाची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्तीला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आज अटक केली. मंगळवारी तिसऱ्यांदा रियाची चौकशी केल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली. सुरुवातीला अमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचा दावा करणाऱ्या रियाने अखेर चौकशीदरम्यान ड्रग्ज सेवनाची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ड्रग्जसाठी रिया शौविकला सूचना करत होती, त्यानुसार अब्दुल आणि जैदच्या संपर्कात राहून शौविक अमली पदार्थ मिळवत असे. त्यानंतर ते सॅम्युअल मिरांडाकडे देत असे. त्यानंतर रियाच्या सांगण्यावरून दीपेश ते ड्रग्ज घेऊन येत असल्याची कबुली रियाने दिल्याची माहिती आहे. अमली पदार्थांच्या सेवनावरून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, सुशांत सावंत या तिघांच्या अटकेनंतर रियाभोवती चौकशीचा फास एनसीबीने आवळला होता. मंगळवारी चौकशीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर रियाच्या अटकेच्या प्रक्रियेला ‘एनसीबी’ने सुरुवात केली. एनसीबीने सोमवारी केलेल्या चौकशीत रियाने अमली पदार्थ स्वतः विकत घेणे, हातात घेणे याबाबत स्पष्ट नकार दिला होता. तसेच यादरम्यान रियाने बॉलीवूडमधील जवळपास १९ बड्या लोकांची नावे घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता या सेलिब्रिटींवरही चौकशीची टांगती तलवार आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या