रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून सहा तास चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

रविवारी सकाळी एनसीबीचे अधिकारी रियाच्या घरी चौकशीचे समन्स घेऊन पोहचली. यावेळी रियाला २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज चौकशी केली. बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्‍शन आणि ड्रग्ज सेवनाबाबतही रियावर आरोप करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या चौकशीत गोव्यातील व्यावसायिक गौरव आर्यचे नाव समोर आले आहे. त्यामुळे रियासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

ड्रग्जसाठी रियाने गौरव आर्यला संपर्क केल्याचा आरोप आहे. सीबीआयने याप्रकरणी शनिवारी स्मिता पारेख, राधिका नेहलानी, संदीप सिंह यांची चौकशी केली. मात्र, सुशांतचा घरातील नोकर दीपेश सावंतला एनसीबीने ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने रिया आणि शौविकच्या सांगण्यावर सॅम्युअल मिरांडाकडून ड्रग्जची ने-आण केल्याची कबुली दिली. यामुळे सॅम्युअल यालाही एनसीबीने अटक केली आहे. रविवारी सकाळी एनसीबीचे अधिकारी रियाच्या घरी चौकशीचे समन्स घेऊन पोहचली. यावेळी रियाला २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार रिया एनसीबी कार्यालयायात हजर झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी संशयास्पद आणि चुकीची माहिती रियाकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

त्यामुळे एनसीबीने शौविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि रियाची समोरासमोर बसवून चौकशी केली. ड्रग्ज प्रकरणी तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथून आरोपी ड्रग डीलर झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना एनसीबीने अटक केली. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या