रिया चक्रवर्तीवर अटकेची तलवार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 सप्टेंबर 2020

शौविक, मिरांडाला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक केल्यानंतर आता रियावरही अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, रियाच्या सांगण्यावरूनच सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली मिरांडा व शौविकने चौकशीदरम्यान दिली होती.  

‘एनसीबी’ने शुक्रवारी सकाळी रिया आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी छापे घातल्यानंतर मिरांडाला ताब्यात घेतले, तर शौविकला तत्काळ समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी रियाच्या सांगण्यावरून सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करीत असल्याचे सांगितले. तसेच ते ड्रग्ज रिया आणि दीपेश सांवतला देत होतो, त्यानंतर ते सुशांतला दिले जात असल्याची कबुली शौविक आणि सॅम्युअलने दिली आहे. या वेळी शौविक आणि सॅम्युअल यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने या दोघांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. 

एनसीबी शौविक व मिरांडा यांच्यासमोर रियाचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे रियाला लवकरच समन्स पाठविण्यात येईल; तर दीपेश सावंतकडून मिळणारी माहिती या प्रकरणात महत्त्वाची ठरू शकते, असा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. एनसीबीने एकाच वेळी बसीत, जैद, शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांची समोरासमोर चौकशी केली असता शौविकच्या सांगण्यावरून बसितने जैदकडून अमली पदार्थ आणले, तर जैदकडून शौविकने अमली पदार्थ घेतले, असे समोर आले आहे. शौविक अमली पदार्थ घेऊन सॅम्युअलकडे गेला आणि शौविकच्या सांगण्यावरून अमली पदार्थांचे पैसे दिले, असे सॅम्युएल मिरांडाने कबूल केले आहे. 

रियाच्या अटकेची शक्‍यता
रियाचा भाऊ शौविक आणि तिचा खास माणूस सॅम्युअल मिरांडा यांच्या अटकेमुळे आता रियाच्या अटकेची ही दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. कारण शौविक आणि रिया यांच्यात अमली पदार्थ खरेदी- विक्रीबाबतीत चॅटिंग झाले असून रियाचे संशयित अमली पदार्थ तस्कर गौरव आर्या याच्यासोबतची चॅट समोर आले आहे. या चॅटवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात रियाला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे रियाच्या डोक्‍यावरही अटकेची टांगती तलवार आहे.केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) सुशांतसिंह राजपूतचा नोकर दीपेश सावंतला शनिवारी अटक केली. ही या प्रकरणातील तिसरी अटक आहे. सुशांतसिंह राजपूत राहत असलेल्या दोन मजल्यांच्या फ्लॅटमध्ये दीपेश तळमजल्याला राहायचा. सुशांतच्या मृत्यूवेळी दीपेश घटनास्थळी उपस्थित होता.

संबंधित बातम्या