रिया साक्षीदारांना फितवते

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

याचिका फेटाळण्याची सुशांतसिंहच्या वडिलांची मागणी

मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे रियाची मागणी अर्थहीन (निष्फळ) ठरली असून ती साक्षीदारांना फितवते, असा आरोप वडिलांनी केला आहे; तर रिया सुशांतला ब्लॅक मेल करत होती, असा दावा बिहार सरकारने प्रतिज्ञापत्रामध्ये केला आहे. तर

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांनी रिया आणि अन्य पाच जणांविरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फौजदारी फिर्याद बिहारमध्ये राजीव नगर पोलिस ठाण्यात केली आहे. ही फिर्याद मुंबईत वर्ग करण्याची मागणी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. मात्र केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे आणि तशी अधिसूचनाही जारी केली आहे. त्यामुळे रियाने केलेली याचिका आता अर्थहीन झाली आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील महत्त्वपूर्ण साक्षीदार सिद्धार्थ पिटानीलादेखील रिया प्रभावित करत आहे, असा खळबळजनक आरोपही सिंह यांनी केला आहे. बिहार पोलिसांविरोधात मुंबई पोलिसांना सिद्धार्थने केलेले ई-मेल रियाच्या याचिकेत कसे काय आले आहे, यावरून ती सिद्धार्थला प्रभावित करीत आहे, असेच दिसते, असा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात 11 ऑगस्टला याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, रिया सुशांतला औषधांचा ओव्हरडोस देत असे आणि त्याला ब्लॅकमेलही करत होती, असा दावा बिहार सरकारने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्याच्या मालमत्तेचे सर्व व्यवहार तिने ताब्यात घेतले होते आणि त्याला धमकावतही होती, असे बिहार सरकारचे म्हणणे आहे. सिंह यांनी केलेल्या तक्रारीचा दाखला यामध्ये देण्यात आला आहे. फिर्यादीचा तपास मुंबईमध्ये वर्ग कारावा, अशी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात केली होती.
आतपर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मुंबई पोलिसांनीही सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. यामध्ये तपास व्यावयिक पद्धतीने सुरू केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनेही आता या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र असा वाद रंगणार आहे.

संबंधित बातम्या