सिंधुदुर्गात भरपावसात रस्ताकाम रोखले

Dainik Gomantak
रविवार, 7 जून 2020

वेतोरे-दाभोली मार्ग ः जिल्हा परिषद अध्यक्ष दाखल

वेंगुर्ले

तालुक्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसातच वेतोरा ते दाभोली या मुख्य रस्त्याचे काम सुरु होते. त्याठिकाणी कोणीही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी उपस्थित नव्हते. भर पावसात रस्त्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी त्याठिकाणी जात ते काम बंद केले.
वेतोरा ते दाभोली या मुख्य रस्त्याचे काम बरेच दिवस मंजूर झाले होते. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक होते. वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत असल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. दरम्यान, आज भर पावसात संबंधित ठेकेदाराने हे काम सुरु केले. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी कार्यकारी अधियंता युवराज देसाई यांच्याशी संपर्क साधला असता लोकांच्या मागणीमुळे काम सुरू करावे लागले असे त्यांनी सांगितले; मात्र भर पावसात काम केल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल करत सौ. नाईक यांनी हे काम बंद पाडले.

 

 

संबंधित बातम्या