'सकाळ' माध्यम समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

संगणकाचा वापर वाढावा, यासाठी भाऊसाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. विविध आवृत्यांसाठी प्रिंटिंग प्रेस उभ्या करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र आणि गोव्यात सकाळ समूहाच्या छपाईचे काम वेगाने आणले. दर्जेदार होऊन वीतरण प्रणालीत सुधारणा होण्यात या कामगिरीचा मोठा वाटा आहे.

पुणे- सकाळ माध्यम समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील (वय ५५) यांचे गुरूवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि तीन भाऊ, असा परिवार आहे.

पाटील यांना ‘पी-अँकाव्हॅस्क्युलायटीस’ नावाचा दुर्मीळ आजार असल्याचे निदान दोन आठवड्यांपूर्वी झाले. हा आजार रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे. येथील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सूरू होते. दुपारी २.२५ वाजता त्यांची प्राणज्योत  मालवली. पाटील हे मुळचे  कोल्हापूर जिल्ह्यातील बामणी येथील आहेत.

'सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालक मृणाल पवार यांच्यासह सकाळ परिवारातील सदस्य आणि मित्रपरिवाराने जोशी हॉस्पिटलमध्ये पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

जोशी हॉस्पिटलचे डॉ. चंद्रकांत फणसळकर यांनी सांगितले की, पी-अँकाव्हॅस्क्युलायटीस हा रक्तवाहिन्यांचा अत्यंत दुर्मिळ आजार शरीरातील प्रतिकारशक्तीमधील दोषामुळे होतो. शरीरातील प्रतिकारशक्ती रक्तवाहिन्यांच्या विरोधात काम करत राहिल्याने सर्व अवयवांच्या रक्तपुरवठ्यात दोष निर्माण होतो आणि अवयवांची कार्यक्षमता कमी होते. अशाच प्रकारची गुंतागुंतीची परिस्थिती भाऊसाहेब पाटील यांच्या आजारात होती, असे ते म्हणाले.  

संगणकाचा वापर वाढावा, यासाठी भाऊसाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. विविध आवृत्यांसाठी प्रिंटिंग प्रेस उभ्या करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र आणि गोव्यात सकाळ समूहाच्या छपाईचे काम वेगाने आणले. दर्जेदार होऊन वीतरण प्रणालीत सुधारणा होण्यात या कामगिरीचा मोठा वाटा आहे. आधुनिक तंभज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांनी जर्मनीसह अन्य देशांमध्ये देखील प्रशिक्षण घेतले.

'सकाळ'च्या डिजिटल आणि विविध विभागातील तंत्रज्ञानाचा वापर, यांसह वृत्तपत्रातील दर्जात्मक वृध्दीसाठी ‘सकाळ’ला वॅन इन्फ्रा या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे सन्मानित करण्यात आले. असा सन्मान मिळविण्यात पाटील यांचे परिश्रम कारणीभूत होते. प्रिंट, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा पाया त्यांनी 'सकाळ' मध्ये भक्कम केला.

संबंधित बातम्या