सातारकरांनी शोधला दुर्मिळ कीटक

discovery
discovery

सातारा

साताऱ्यातील तीन संशोधकांनी उरमोडी धरण पाणवठा क्षेत्रात एका अत्यंत दुर्मिळ व विलुप्त समजण्यात येणाऱ्या चतुर (ड्रॅगन/डॅमसेल फ्लाय) परिवारातील "लेस्टेस पॅट्रिशिया' या प्रजातीची तब्बल 100 वर्षांनंतर नव्याने नोंद करण्यात यश मिळवले. 1922 साली या प्रजातीचा एकमेव नर कीटक कर्नाटकातील कूर्ग परिसरात आढळला होता. तो नमुना सध्या लंडन येथील नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये आहे.
सातारा शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम भाकरे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे व कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिमा पवार-भोईटे यांनी हे यश मिळवले आहे. जवळपास 100 वर्षे या प्रजातीचा पश्‍चिम घाटात शोध घेण्याचा अथक प्रयत्न अनेक संशोधक करीत होते. निसर्गाचा मानवनिर्मित विनाश बघून कदाचित ही दुर्मिळ प्रजाती कायमची विलुप्त झाली असावी, अशी चर्चा संशोधकांमध्ये दीर्घकाळ सुरू होती. परंतु, या नवीन शोधामुळे त्याच्या अस्तित्वास पुष्टी मिळाली आहे. लंडन म्युझियममध्ये "लेस्टेस पॅट्रिशिया'च्या नमुन्याशी या नवीन नोंदविलेल्या उप-प्रजातीची तुलना करता त्याच्या शरीररचनेसह बाह्य अंगावरील ओळखणीच्या खुणा व वैशिष्ट्यांमध्ये मुख्यत्वेकरून फरक दिसून आला. त्यामुळे ही प्रजाती सद्य:स्थितीत "लेस्टेस पॅट्रिशिया'चीच उपप्रजाती "लेस्टेस पॅट्रिशिया ताम्रपट्टी' या नावाने नोंदविण्यात आलेली आहे. त्या संबंधीचा त्यांचा शोधनिबंध नुकताच "बायो नोट्‌स' या राष्ट्रीय व मान्यताप्राप्त नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.
सातारा परिसरातील कीटकांच्या जैवविविधतेचा दीर्घ काळापासून अभ्यास करणारे डॉ. भाकरे, श्री. व सौ. भोईटे यांनी या प्रजातीचा शोध लावल्यामुळे सातारा परिसरातील सूक्ष्म जैवविविधतेचे महत्त्व तसेच त्याच्या संवर्धनाची आवश्‍यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. याबद्दल या अभ्यासकांचे देशभरातील संशोधकांनी, मान्यवर व सातारा परिसरातील निसर्गप्रेमींनी अभिनंदन केले.

संशोधनाबरोबर जतनासाठी प्रयत्नांची गरज
आपल्या आजूबाजूस आढळणारे अशा प्रकारचे सूक्ष्मजीव, कीटक हे नेहमीच मानवास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यभूत असतात. यावर अधिक संशोधन होऊन त्यांच्या जतनासाठी प्रयत्न अधिक जोमाने करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा या तीनही संशोधकांनी व्यक्त केली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com