'ज्ञान नाही विद्या नाही, ते घेणेची गोडी नाही, बुद्धी असुनि चालत नाही, तयास मानव म्हणावे का?' : स्त्रीशिक्षणासाठी ज्यांनी समाजाचा रोष पत्करला त्या 'क्रांतीज्योती' सावित्रीबाई फुले

प्रियंका देशमुख
रविवार, 3 जानेवारी 2021

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. १ जानेवारी १८४८ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात सुरू केली होती.

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. १ जानेवारी १८४८ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात सुरू केली होती. इतरांच्या मुलींना शिकवण्याआधी आपल्या घरातील स्त्री शिकलेली पाहिजे आणि सोबतच मुलींच्या शाळेला महिलाच शिक्षिका पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आधी पत्नीला शिकवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका केलं.

 त्यांच्या या महान कामाला ब्राह्मणांनी आणि बहुजनांनीसुद्धा मोठा विरोध केला. त्याकाळात बहुजनांनी बहुजनांना शिक्षण देणं तर दूर साधं मदत करणंही खपत नव्हतं. पण कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न डगमगता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे आपले काम नेटाने पुढे सुरू ठेवले. 

जेव्हा ही शाळा सुरु करण्यात आली तेव्हा सावित्रीबाई यांचे वय अवघे १८ वर्षे होते. १८४८ च्या सुरुवातीला या शाळेत केवळ 6 मुली होत्या. पण, ते वर्ष संपेपर्यंत ही संख्या ४० मुलींपर्यंत जाऊन पोहचली. अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम सुरुच राहिला. 

भारतात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? असा प्रश्न विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचे नाव येते. पण कुठे सुरू केली अस विचारलं तर कुठल्या तरी, वाड्यात सुरू केली होती असं उत्तर ऐकायला मिळतं. आणखी पुढे जाऊन त्यांनी ती कोणत्या वर्षी असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेकांना ते सांगता येत नाही. 

हा झाला इतिहास. पण, अखंड देशात स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची बीजे पेरणाऱ्या आणि फुले दांपत्याच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या शाळेची आज १७२ वर्षांनंतरची अवस्था मात्र, अत्यंत दयनीय झाली आहे. वाड्याची सद्यस्थिती पाहिली तर अंधाऱ्या खोल्या, पडलेल्याला भिंती, कोलमडून पडलेले लाकडी खांब, जमलेली धूळ, जाळे-जळमटं यांनी व्यापलेला अंतर्गत परिसर अशी काहीशी आहे. वाड्यात आत जाण्यासाठी  पटकन लक्षात येईल, असा रस्ताही नाही. 

विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या भिडेवाड्याची ही अशी दुरावस्था नक्कीच लज्जास्पद आहे. आजपर्यंत याकडे शासन, प्रशासनाचं तर दुर्लक्ष झालचं आहे. पण, ज्या स्त्रियांसाठी ही शाळा चालू केली मला त्या स्त्रियांना या दुरावस्थेबद्दल विचारायचे आहे. 

आपल्याला आपला वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस, आपली ॲनिव्हर्सरी, पहिलं गिफ्ट, पहिलं प्रेम, पहिला पगार, नोकरीचा पहिला दिवस, एवढंच काय पहिल्या पगारातून पहिल्यांदा काय खरेदी केली होतं तेही क्लियर आठवतं. पण, आठवत नाही ती पहिली शाळा! आठवत नाही तो भिडेंचा वाडा, पहिले शिक्षक, पहिली शिक्षिका.... आठवत नाही आपल्याच परिवर्तनाचा इतिहास! 

आजही मुलींना, स्त्रियांना व्यासपीठावरून बोलताना विद्येची देवता सरस्वती आठवते पण सावित्री आठवत नाही. जिने शेण-माती अंगावर झेलली, जिने लोकांनी मारलेले दगड धोंडे अंगावर घेतले, जखमी झाली, कर्मठ समाजाचा अत्याचार सहन केला ती कोण? 

तुम्हाला ती सावित्री का आठवत नाही जी घरातून निघताना पिशवीत एक लुगडं टाकून घ्यायची आणि एक अंगावर नेसायची. शाळेपर्यंत पोहचेपर्यंत तिचं लुगडं शेणामातीनं भरून जायचं, शाळेत गेल्यावर पिशवीतील लुगडं काढून बदलून घ्यायची ती, अंगावरच लुगडं शाळेत धुवून वाळत टाकायची आणि मग मुलींना शिकवायला सज्ज व्हायची तेवढ्याच उर्मीने आणि त्याच आत्मविश्वासाने. 

पुन्हा घरी परत जाताना तोच प्रवास तिच्या वाट्याला असायचा. हे सगळं आजच्या स्त्रिया का विसरत आहेत? मठ, मंदिरात लाखाने सहज देणग्या देतो आपण, ती द्यायला देखील काहीच हरकत नाही. पण आपली सुरवात जिथून झाली त्या वाड्याच्या सुशोभिकरणासाठी, तो जतन करण्यासाठी एक रुपया पण खर्च करायची मानसिकता नाही का आपली? 

आता याचं उत्तर जर महानगरपालिका करेल, एखादा राजकीय नेता करेल, ते मोर्चे काढतील, समाजसुधारक आंदोलन करतील, ते पाहून घेतील काय करायचे तर. मला त्याचं काय? असं सहज तुमच्या डोक्यात येत असेल तर या सगळ्यांचं हे काम आहे आणि आपली जबाबदारी आहे. राजकारणात आरक्षणासाठी किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमधील अर्धा हिस्सा मागताना, स्वतःच्या मनाने लग्न करताना आपण स्रिया भांडतो. एवढं कशाला साधं महानगरपालिकेच्या बसमध्ये डाव्या बाजूला बसण्यासाठी हक्काची जागा पाहिजे म्हणून देखील भांडतो.हेच स्वतःच्या हक्कासाठी तुम्हाला आम्हाला आवाज उठवणं ज्या फुलेंनी आणि ज्या जागेनं शिकवलं त्या आपल्या पहिल्या शाळेसाठी नाही का भांडू शकत?

आज पडझड झालेला तो वाडा स्वतःचं अस्तित्व टिकेल की नाही, अशा अवस्थेत आहे. शेवटच्या घटकाच मोजतोय की काय, असा प्रश्न पडतो. आपल्या शाळेचा बोर्ड दुकांच्या गर्दीत हरवला आहे. दगडूशेठ मंदिराच्या समोर असणाऱ्या या वाड्याकडे बाहेरून बघताना ही एक ऐतिहासिक वास्तू असेल, असं कोणालाही वाटणार नाही. त्यामुळे जिथे आपल्या परिवर्तनाची सुरवात झाली, त्या जागेच्या डागडुजीसाठी आपण राजकारणी लोकांची किंवा महानगरपालिकेची वाट का बघावी? त्यासाठी आपण सर्व स्त्रियांनी मिळून पुढाकार घेण्याची गरज आहे. 

अलिकडेच ८ दिवसांपूर्वी सवित्रीज्योति ही मराठी मालिका देखील कदाचित आपल्यामुळेच बंद पडली. नव्हे ती बंद करावी लागली. कारण आपला इंटरेस्ट तर, सासू सुनेच्या भांडणात आहे, बबड्याच्या कुरापती आणि शनायाची कारस्थानं यात आहे. पण ऐतिहासिक, परिवतर्नशील आणि आपला अभिमान सांगणाऱ्या मालिकांमध्ये नाही. याला देखील कदाचित आपणच जबाबदार आहोत. 

१ जानेवारी हा फुले दाम्पत्य सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे खरंच त्यांच्या सन्मानासाठी काही करायचं असेल तर, वाड्याच्या झालेल्या दशेची दिशा बदलवावी लागेल. कुठल्या एका समाजाने त्या सवित्री-ज्योतिला वाटून न घेता, कुठल्या शासन, प्रशासनावर अवलंबून न राहता आपण स्वतः काहीतरी करण्याची वेळ आली आहे. तोच खरा सवित्री-ज्योतिचा सन्मान असेल.

"जोतिबा आणि सावित्रीबाईंनी सुरू केलेली  भिडे वाड्यातील पहिली शाळा हे सर्व भारतीयांच्या शिक्षणाचं प्रतीक आहे. त्याचा सर्वाधिक लाभ महिलांना मिळाला असला तरी पण इतर समाजाला देखील लाभ मिळाला आहे. आणि हे दोघेही नुसते शाळा काढणारे नव्हते तर ते शिक्षण तज्ञ देखील होते. या शाळेत शेती, उद्योग यासोबतच स्वावलंबी बनवणारा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला होता. सोबतच सामाजिक भान निर्माण करणार शिक्षणही त्यांच्या विध्यार्थ्यांना दिलं होतं.  शिक्षण हे मोफत, सक्तीचं आणि सार्वत्रिक असलं पाहिजे, असे म्हणणारे संपूर्ण भारतातील एकमेव दाम्पत्य म्हणजे सवित्रीज्योती होते. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे की, त्यांनी जे काही केलं तो वारसा हा आपला सगळ्यांचा वारसा आहे आणि माणूस हा वारस्यावर जगत असतो. त्यामुळे त्यांचा हा वैभवशाली वारसा आपल्याला नष्ट होऊ द्यायचा नाही. कारण भिडे वाडा राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे."

-प्रा. हरी नरके, 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

"स्वातंत्र्याच्या देखील १०० वर्ष आगोदर ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला त्या फुलेंच्या पहिल्या शाळेचं नक्कीच जतन व्हायला हवे. आजच्या काळातील महिलांना उंबरठ्याच्या बाहेर पडण्याचं सामर्थ्य त्या वाड्याने आणि फुले दाम्पत्याने त्यावेळी दिले. त्यामुळे या वाड्याच्या संवर्धनासाठी समाजातील स्त्रियांसोबत आपण सर्वानीच पुढे यायला हवे."

-श्री प्रकाश आमले, 
Assistant engineering All India Radio, Amravati

संबंधित बातम्या