मुंबई शहरात कोरोनाची दुसरी लाट?

भाग्यश्री भुवड
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

अनलॉक सुरू झाल्यापासून मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी २ हजारपेक्षा अधिक रुग्णांची भर पडत असल्याने त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

मुंबई: अनलॉक सुरू झाल्यापासून मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी २ हजारपेक्षा अधिक रुग्णांची भर पडत असल्याने त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे स्पष्ट संकेत देत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असून नागरिकांची बेफिकीरी या परिस्थितीला कारणीभूत असल्याचेही ते सांगतात.

मुंबईतील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाख ८२ लाख ७७ झाली आहे. रुग्णवाढीचा दर १.२४  आहे; तर मृतांची संख्या ८ हजार ४२२ झाली आहे. त्यातच ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून शहरातील वर्दळ वाढली आहे. त्याचाच परिणाम रुग्णसंख्येवर दिसत आहे.   कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर हा प्रभावी पर्याय असताना मुंबईकरांची बेफिकीरी दिसत आहे. 

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार विनाकारण घराबाहेर पडू नका. मास्कचा वापर करा, असे आवाहन केले आहे. ‘मुंबईत कोरोनाचा प्रभाव कधीच कमी झाला नव्हता. काही दिवसांपूर्वी थोडा प्रसार कमी झाला होता. मात्र, आता शहरात दुसरा उद्रेक झाला असे म्हणता येईल.  

शिस्त आणि नियम पाळणे आवश्‍यक
गेल्या सहा महिन्यांपासून कोव्हिड केंद्रात काम करत आहोत, पण अजून एकही डॉक्‍टर पॉझिटिव्ह झाला नाही. काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. सध्या नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली आहे  त्यामुळे आता शिस्त आणि नियम पाळणे गरजेचे आहे. कारण प्रत्येकाच्या घरी कोणीतरी ज्येष्ठ नागरिक असेल. सुरुवातीला ४०० रुग्ण एका दिवसात येत होते. मधल्या काळात ते कमी होऊन २०० किंवा त्याहून कमी येत होते. मात्र, आता सर्व खाटा भरल्या आहेत. आयसीयूही फुल आहेत. आता १२० हून अधिक रुग्ण एका दिवशी आढळत आहेत, अशी माहिती एनएससीआय प्रमुख नीता वर्टी यांनी दिली. 

कॉन्ट्रॅक्‍ट  ट्रेसिंग २० पटीने वाढण्याची गरज
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आहे, असे म्हणता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, जर आपण काळजी घेतली नाही तर कोरोनाची दुसरी लाट येईल. टेस्ट कमी केल्यामुळे रुग्णसंख्या ही कमी दिसत होती. ४ ते ६ हजारांच्या वर टेस्ट होत नव्हत्या. चौथ्या-पाचव्या दिवशीच रुग्णांची लक्षणे कमी दिसली की त्यांना डिस्चार्ज देण्यात येत होता. आयुक्तांनी असा आदेश दिला होता की रोज २५ टक्के रुग्ण डिस्चार्ज झालेच पाहिजेत.  त्यामुळे रुग्णसंख्या कमी झालेली असावी, अशी शंका आहे.

भारत कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात
भारताने कोरोना संसर्गाचा दुसरा टप्पा पार केलेला आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. ५० लाख रुग्णांचा टप्पा आपण पार केलेला आहे, ज्यामुळे सध्या आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. लॉकडाउन उठवल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले आहेत. त्यांना असे वाटत आहे की, लॉकडाऊन हटवला म्हणजे कोरोना ही संपलेला आहे. नागरिकांचे हे वर्तन योग्य नाही. 

दिल्लीत सामूहिक संसर्गाकडे चाललो आहोत, हे आयसीएमआरने मान्य केले आहे.  कोरोनावरची लस किंवा लोकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. या दोन गोष्टीच आपल्याला वाचवू शकतात. हा विषाणू नैसर्गिक वाटत नाही. हा माणसाने तयार केलेला विषाणू आहे. तो तापमान बदलामुळे जाईल याची शक्‍यता दिसून येत नाही, असे आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या