वृद्ध रुग्णाचा रिक्षातच मृत्यू

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

रुग्णालयात दाखल करण्यास पाच वेळा नकार; कोव्हिड चाचणी न झाल्याचे कारण

मुंबई

कोव्हिड चाचणी केली नाही म्हणून खासगी रुग्णालयाने एका वृद्धाला दाखल करून घेण्यास पाच वेळा नकार दिला. त्यानंतर या वृद्धाचा रिक्षातच मृत्यू झाल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. 
निवृत्त महापालिका कर्मचारी असलेल्या या 67 वर्षीय वृद्धाच्या रक्तातील क्रिएटिनीनची पातळी मंगळवारी 12.9 पर्यंत वाढली होती. सामान्यत: ही पातळी 0.5 ते 1.4 असणे आवश्‍यक असते. त्यामुळे पत्नी त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात घेऊन गेली. तिथे परिचारिकेने आपत्कालीन विभागात त्यांच्या पोटाचा एक्‍स-रे काढला आणि खाट उपलब्ध नसल्याचे कारण देत वांद्रे येथील भाभा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतु महापालिकेच्या भाभा रुग्णालया फक्त कोव्हिड-19 च्या रुग्णांवर उपचार केले जात असल्यामुळे त्यांना दाखल करता आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा होली फॅमिली रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांचा मुलगा वैद्यकीय अहवाल घेऊन लीलावती रुग्णालयात घेऊन गेला. तिथेही कोव्हिड चाचणीशिवाय दाखल करून घेतले जाणार नाही, असे सांगण्यात आले. अखेरीस मुलाने त्यांना होली फॅमिली रुग्णालयातून थेट घरी नेले. होली फॅमिली रुग्णालयाने खाट उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना घरी पाठवले, असे या वृद्धाच्या मुलाने सांगितले.
बुधवारी या व्यक्तीला श्‍वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यामुळे पत्नी पुन्हा त्यांना होली फॅमिली रुग्णालयात घेऊन गेली. पतीवर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी त्यांनी परिचारिकांकडे मदत मागितली. या रुग्णाला तात्काळ डायलिसिसची गरज होती. काही तासांनंतर होली फॅमिली रुग्णालयाच्या खासगी प्रयोगशाळेत त्यांची कोव्हिड-19 ची चाचणी करण्यात आली. त्यासाठीही त्यांना आपत्कालीन विभागात 6 तास प्रतीक्षा करावी लागली. आपत्कालीन विभागाच्या बाहेर बसण्यासाठी त्यांना व्हीलचेअर देण्यात आली होती. तिथेच खासगी तंत्रज्ञाने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी घेले. त्यानंतर आपण घरी परत येत असल्याचे त्यांच्या पत्नीने मुलाला दूरध्वनी करून सांगितले. बुधवारी सायंकाळी घरी जाताना रिक्षातच या रुग्णाचा मृत्यू झाला. 

आजारी पडण्यासाठी वेळच चुकीची... 
पतीला पाच वेळा होली फॅमिली रुग्णालयात नेले; मात्र कोव्हिड चाचणी न झाल्यामुळे त्यांना दाखल करून घेण्यास प्रशासनाने नकार दिला. त्यांना पूर्ण दिवस श्‍वास घेण्यास त्रास होत होता; मात्र कोणीही तपासले नाही, अशी खंत या रुग्णाच्या पत्नीने व्यक्त केली. कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आजारी पडण्यासाठी ही वेळच अत्यंत चुकीची आहे, अशी भावनाही तिने बोलून दाखवली. 

मृत्यूबाबत आईला कल्पनाच नाही
या रुग्णाची 90 वर्षीय आई आपल्या मुलाला घरी आराम करता यावा, म्हणून तयारी करत होती; परंतु घरी येत असताना रिक्षातच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री मृतदेह घरी आणल्यानंतर त्यांच्या आईला मुलाच्या मृत्यूबाबत कळले.

रुग्ण उपचारांविना परत जाता कामा नये
राज्य सरकारने 30 एप्रिलला जारी केलेल्या नियमावलीनुसार, रुग्णालय प्रशासनाला संशयित कोव्हिड-19 रुग्णाची प्राधान्याने चाचणी करणे गरजेचे आहे. अहवाल येत नाही तोपर्यंत अशा रुग्णावर उपचार केले पाहिजेत. कोणताही रुग्ण कुठल्याही परिस्थितीत उपचारांशिवाय परत जाता कामा नये, असे या नियमावलीत म्हटले आहे. तथापि, अनेक खासगी रुग्णालये या नियमावलीचे उल्लंघन करून रुग्णांना उपचारांविना घरी पाठवतात. कोव्हिड-19 चाचणीचा अहवाल प्रलंबित असेल, तरीही उपचार करणे आवश्‍यक आहे. 

संबंधित रुग्णाला डायलिसिसची गरज होती; परंतु आमच्या रुग्णालयात फक्त एकच सेंटर आहे. ती व्यक्ती संशयित कोव्हिड रुग्ण असल्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नव्हतो. आम्ही त्यांना सेव्हन हिल्स आणि नानावटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. रुग्णालयात नऊ कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्यामुळे एकही बेड उपलब्ध नव्हता. बुधवारी दुपारी बी विंगमध्ये खाट उपलब्ध झाली होती. 
- डॉ. नीरज उत्तमनी, वैद्यकीय संचालक, होली फॅमिली रुग्णालय.

संबंधित बातम्या