परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर शरद पवार यांनी बोलावली तातडीची बैठक 

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 मार्च 2021

अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच दबाव वाढत आहे.

अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच दबाव वाढत आहे. आणि त्यामुळे याच दबावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची दिल्लीत बैठक बोलावली असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत शिवसेनेचे संजय राऊतही उपस्थित राहणार असल्याचे समजते. व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे आता म्हटले जात आहे. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी गृहमंत्र्यांना पत्र : नारायण राणे 

दुसरीकडे, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचे वर्णन अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच शरद पवार यांच्यासोबत बैठक घेणार असून तेच यावर निर्णय घेतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत. इतकेच नव्हे तर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे. 

याशिवाय, महाराष्ट्रातील या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर एक शेअर पोस्ट केला आहे. या शेअर मध्ये काही राजकीय संदेश शोधता येत असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये जावेद अख्तर यांचा शेअर पोस्ट केला आहे असून, यात  'हमको तो बस तलाश नए रास्‍तों की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए हैं।', लिहिले आहे. मात्र, या ट्वीटचा राजकीय हेतू आहे की नाही हे फक्त संजय राऊतच सांगू शकतील. 

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्र लिहिले असून, ते पत्र आज लेटर बॉम्ब ठरत आहे. या पत्रात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. या पत्रात परमबीर सिंग यांनी, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले असल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे  यांना बार, रेस्टॉरंट्स व इतर आस्थापनांमधून दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक उल्लेख परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे. 

तर, परमबीर सिंग यांच्या आरोपावर अनिल देशमुख यांनी उत्तर देताना, अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचा थेट संबंध येत असल्याचे म्हटले आहे. तसेच परमबीर सिंग यांना याचे कनेक्शन आपल्यापर्यंत पोहचतील अशी भीती वाटत असल्यामुळे त्यांनी आपल्यावर आरोप केले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. शिवाय, परमबीर सिंग यांनी कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठीच अशा प्रकारचे पत्र लिहिले असल्याचे अनिल देशमुख यांनी पुढे म्हटले आहे.  

संबंधित बातम्या