परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Sharad Pawar.jpg
Sharad Pawar.jpg

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावर महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्राने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याच्या शक्यता असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. परमबीर सिंह यांनी त्यांची बदली झाल्यावरच हे आरोप का केलेत? असा सवाल शरद पवार यांनी आज उपस्थित केला. तसेच विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेल्यावरच परमबीर सिंहांचे हे पत्र समोर आले आहे, त्यामुळे परमबीर सिंह यांच्या भूमिकेबद्दल शरद पवार यांनी शंका उपस्थित केली  आहे. (Sharad Pawars questions on Parambir Singhs letter)

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्यामागे शरद पवार यांचा मोठा हात होता. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना शरद पवार यांनी या प्रकरणात आपली भूमिका मांडली. या प्रकरणावर बोलताना त्यांनी परमबीर सिंह यांच्या भूमीकेबद्दल काही  प्रश्न उपस्थित केले आहेत. परमबीर सिंह त्यांच्या बदली नंतरच मुख्यमंत्र्याना हे पत्र का दिले? त्या पत्रावर त्यांचे हस्ताक्षर का नाही? त्या पत्रात 100 कोटी रुपये कुणाला दिले याचा उल्लेख का नाही? असे प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केले.

या पत्रकार परिषदेच्या आधी आपली मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पत्रकारांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला असता, अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याबद्दलचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्याना असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी उद्या पर्यंतची वेळ देऊन, त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुद्धा शरद पवार यांनी दिली. तसेच याप्रकरणाचा महाविकास आघाडी सरकारवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे शरद पवार यांनी दिल्ली मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, सचिन वाझे (Sachin Vaze) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्ष केंद्राच्या तपास यंत्रणांचा आपल्या फायद्यासाठी वापर करत असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठीच हा प्रयत्न करत असल्याचा आरोप  केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com