अतिसंवेदनशील हिरेन प्रकरण उलगडले; तपास अधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 21 मार्च 2021

महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून हिरेन प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा केला आहे. 

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. कालच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्यामुळे  या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. त्यातच आता या प्रकरणाचा तपास करत असणारे महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून हिरेन प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा केला आहे. (Shivdeep Lande claimed on Facebook post that Sensitive Hiren case has been uncovered)

परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र एटीएस दलातील अधिकारी आणि मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासाचा भाग असणारे शिवदीप लांडे यांनी या प्रकरणाशी संबंधित फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्ट मध्ये शिवदीप लांडे यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले असल्याचा दावा केला आहे. "अत्यंत संवेदनशील अशा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आपल्या एटीएस दलातील सर्व साथीदारांना सलाम करतो, ज्यांनी मागच्या काही दिवसात रात्रंदिवस एक करून या प्रकरणाचा योग्य मार्गाने उलगडा केला. हे प्रकरण माझ्यासाठी पोलीस दलातील पूर्ण सेवेतील एक कठीण प्रकरण होते," अशा आशयाची फेसबुक पोस्ट करून शिवदीप लांडे यांनी त्यासोबत आपला सलामी देतानाचा फोटो फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांच्या या फेसबुक पोस्टचा नेमका काय अर्थ होतो? हिरेन प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असेल का? हे आता लवकरच समोर येईल. तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणा देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

दरम्यान, आता पर्यंत या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. तर,  मुंबई पोलीस (mumbai police) दलातील निलंबित कर्मचारी विनायक शिंदे आणि एक बुकी यांना महाराष्ट्र एटीएसकडून अटक करण्यात आलेली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर अनिल देशमुख  यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून मुख्यमंत्रीच त्यांच्या बद्दलचा निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या