शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम लवकरच

Dainik Gomantak
रविवार, 28 जून 2020

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी ई निविदा

मुंबई

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) गेल्या आठ वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम लवकरच सुरू करणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारची नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निर्णय घेतला असून निविदाही काढली आहे. शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पावरून येणाऱ्या वाहतुकीसाठी हा उन्नत मार्ग अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे ट्रान्सहार्बर लिंक सुरू होण्यापूर्वी हा मार्ग पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे प्रयत्न आहेत.
शिवडी-वरळी उन्नत 4.5 कि.मी. लांब आणि 17.20 मीटर रुंद असा मार्ग असेल. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी एमएमआरडीएने 2012 मध्ये सर्वप्रथम सल्लागाराची नियुक्ती केली होती. त्या प्रकल्प अहवालानुसार बांधकामासाठी 490 कोटींचा खर्च, तर एकूण अंदाजित किंमत 517 कोटी होती. ट्रान्सहार्बर लिंकसाठी एमएमआरडीएने सर्वप्रथम बीओटी तत्त्वावर निविदा काढल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिवडी-वरळी मार्गाचे कामही सुरू करता आले नव्हते. यासाठी पुन्हा एमएमआरडीएने या मार्गाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी ई निविदा प्रसिध्द केल्या आहेत. या अहवालाच्या आधारे निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी 30 जूनला एमएमआरडीएने बैठकीचे आयोजन केले आहे. 28 जुलैला या निविदा प्रसिद्ध होणार आहेत.

असा आहे उन्नत मार्ग
साडेचार किलोमीटर लांब आणि 17.20 मीटर रुंद असा हा उन्नत मार्ग आहे. तो शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन हार्बर रेल्वे मार्ग ओलांडून आचार्य दोंदे मार्ग, डॉ. आंबेडकर मार्गावरून प्रभादेवी स्थानकाजवळ मध्य व पश्‍चिम रेल्वे मार्ग ओलांडून, सेनापती बापट मार्ग-जगन्नाथ भातणकर मार्गावरून कामगार नगर 1 व 2 येथून ऍनी बेझंट मार्ग पार करून वरळी येथील नारायण हर्डीकर मार्ग येथे संपेल. आचार्य दोंदे मार्गावर जी. डी. आंबेकर मार्ग ते डॉ. ई. बोर्जेस मार्गादरम्यान हा उन्नत मार्ग मोनो रेल मार्गावरून जाईल. त्याचप्रमाणे हा मार्ग डॉ. आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल व सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून जाणार आहे.

संबंधित बातम्या