मुंबईच्या शिवसेना नेत्याने दिले 'कराची स्वीट्स'ला अल्टिमेटम; १५ दिवसांत नाव बदलावे अन्यथा...

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

दुकानाचे नाव 'कराची स्वीट्स' असे का आहे, असा सवाल करत शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी एका दुकानदाराला दुकानाचे नाव बदलण्याचे अल्टिमेटमच देऊन टाकले.

मुंबई- दुकानाचे नाव 'कराची स्वीट्स' असे का आहे, असा सवाल करत शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी एका दुकानदाराला दुकानाचे नाव बदलण्याचे अल्टिमेटमच देऊन टाकले. यानंतर या दुकानदाराने आपल्या दुकानाचा फलक झाकून टाकला. कराची नावावर आम्हाला हरकत आहे, तेथून आतंकवादी येतात, असे बोलतानाचा नांदगावकर यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.    

आपल्या फेसबूक बायोमध्ये स्वत: सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी असे लिहिणाऱ्या नितीन नांदगावकर यांनी स्वत:च्या पेजवरून हा व्हिडिओ स्वत: शेअर केला आहे. यात ते मुंबईतील वांद्रे येथील कराची स्वीट्स नावाच्या दुकानाचे नाव बदलण्याचे सांगत आहेत.  
 
व्हिडिओत दुकानदाराला काय म्हटले आहे?

 नितीन नांदगावकर यांनी दुकानदाराला बोलताना तो हिंदू, मुस्लिम किंवा अन्य धर्माचा असो पण मुंबईत हे नाव ठेऊ नये, असे सांगितले. कराची म्हणजे तुम्ही पाकिस्तानचेच आहात असा त्याचा अर्थ होतो. यावर उत्तर देताना दुकारदानाने, 'हो, आमचे पूर्वज पाकिस्तानचेच होते, असे सांगितले. 

 यावर पुन्हा नितीन म्हणाले, 'पूर्वज पाकिस्तानचे होते. मात्र, फाळणी झाल्यावर तुम्ही इथे आलात. तुमचं स्वागत आहे. तुम्ही व्यवसाय़ करा मात्र, कराची नाव ठेऊ नका. कराची नावावर आम्हाला खूप आक्षेप आहे. आपले रजिस्टर आपण बदलावे. मी वचन देतो आपला धंदा आम्ही करवून देऊ, पण हे नाव बदलावे. आतंकवादी येताना पाकिस्तानमधील कराचीतूनच येतात. तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने दुकान चालवा. परंतु, कराची नाव काढून टाकावे. यासाठी आपल्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढा घ्यावा. मात्र, 15 दिवसांनंतर मी पुन्हा आल्यावर मला या दुकानाचं नाव बदललेलं दिसायला हवं', अशी ताकीद त्यांनी संबंधित दुकानदाराला दिली. 
 
यानंतर मात्र, दुकानदाराने दुकानाच्या बाहेरील पाटीवर कागद लावून ती झाकून टाकली आहे. काही वृत्त वाहिन्यांनी याबाबत त्यांच्य़ाजवळ विचारणा केल्यावर दुकानाचे नाव बदलावे की नाही याबाबत आपण वकीलांचा कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. 

संबंधित बातम्या