कोणतेही दबावाचे राजकारण सुरू नाही; सोनिया गांधींच्या पत्रानंतर शिवसेनेचे स्पष्टीकरण

 कोणतेही दबावाचे राजकारण सुरू नाही; सोनिया गांधींच्या पत्रानंतर शिवसेनेचे स्पष्टीकरण
Udhhav thakre and Sonia Gandhi

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधींनी लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता शिवसेनेकडून अधिकृत उत्तर आले आहे. राज्यात कोणतेही दबावाचे राजकारण होत नसून सोनिया यांच्या पत्रात काहीही विशेष नाही असे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय असून येथे दबावाच्या राजकारणाला कोणतीही जागा नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्षा असून त्यांची आणि शरद पवारांची महाविकास आघाडीच्या निर्मितीत महत्वाची भूमिका होती. आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी स्थापन केल्यावर एक कॉमन मिनिमम कार्यक्रम ठरला होता. हे पत्र या संबंधीच होते. कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमातील अनेक कामे अपूर्ण राहिले. या महामारीमुळे काही नवीन योजनांचे कामही अपूर्ण राहिले, असे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

पुढे बोलताना ते म्हणाले, 'महाराष्ट्र आणि राज्यातील जनतेच्या हिताचे कोणतेही काम काँग्रेस आणत असेल तर त्याचे स्वागतच केले जाईल. येथे दबावाचे कोणतेही राजकारण नाही. आम्ही त्यांच्याबरोबर आघाडीत आहोत.' 

काल(18 डिसेंबर)एका वृत्तसंस्थेने सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले असल्याचा खुलासा केला होता. ज्यात सरकारला कॉमन मिनिमम कार्यक्रमांतर्गत दलित आणि आदिवासींच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची आठवण करून दिल्याचे सांगितले होते. 
कांग्रेसने इतिहासात पहिल्यांदाच आपल्या पक्षाच्या विचारसरणीत न बसणाऱ्या पक्षाशी आघाडी केली असून भाजपला पराभूत कऱण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहास्तव काँग्रेसने हा निर्णय घेतला होता. यानंतर मात्र, आघाडी सरकारमध्ये काँग्रेसमध्ये कुचंबनाच झाली असल्याच्या चर्चा अनेकदा राजकीय वर्तूळात ऐकायला मिळल्या आहेत.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com