श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

महाराष्‍ट्र राज्‍य शासनाच्‍या आदेशाने आज ता. १६ नोव्‍हेंबरपासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले

शिर्डी: महाराष्‍ट्र राज्‍य शासनाच्‍या आदेशाने आज ता. १६ नोव्‍हेंबरपासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले असून दिवसभरात सुमारे ८ हजार २९० साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

श्री.बगाटे म्‍हणाले, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून महाराष्‍ट्र शासनाच्‍यावतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले होते. १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाने १६ नोव्‍हेंबरपासून पाडव्‍याच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिले आहेत. तसेच अजून कोरोना महामारीचे सावट संपले नाही. साईभक्‍तांना श्रींचे दर्शन सुलभतेने व्‍हावे तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था आदी उपाययोजना संस्‍थानच्‍यावतीने करण्‍यात आल्‍या.

दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांना गेट नंबर २ मधून प्रवेश देऊन द्वारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे ५ नंबर गेटद्वारे बाहेर जाणे असा मार्ग उपलब्‍ध करून देण्‍यात आला. लॉकडाऊननंतर सुमारे ८ महिन्‍याने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आल्‍यामुळे भक्‍तांच्‍या अतिउत्‍साहामुळे दिवसभरात ८ हजार २९० साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये शिर्डी ग्रामस्‍थ व शिर्डी पंचक्रोशीतील भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तर मंदिर व मंदिर परिसरासह दर्शन रांगेत फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली होती.

प्रसादालयही सुरू 
सोमवारी पहाटे काकड आरतीनंतर साईभक्‍तांना गेट नंबर २ मधून श्रींच्‍या समाधी मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्‍यात आला. तसेच श्री साई प्रसादालयात साईभक्‍तांसाठी भोजन प्रसाद सुरू करण्‍यात आले. आज दिवसभरात सुमारे ३ हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. याठिकाणी प्रसाद भोजन घेण्‍यासाठी आलेल्‍या प्रथम ५ साईभक्‍तांचे व दुपारी १२ वाजता श्रींच्‍या माध्‍यान्‍ह आरतीसाठी प्रथम १० शिर्डी ग्रामस्‍थांचे व १० साईभक्‍तांचे पारंपारिक वाद्यांसह पुष्‍पवृष्‍टी करून स्‍वागत करण्‍यात आले. तर साईभक्‍तांद्वारे देणगी कार्यालयात सुमारे २ लाख ५० हजार रुपये देणगी प्राप्‍त झासल्‍याचे श्री. बगाटे यांनी सांगितले.  

साईभक्तांकडून समाधान
श्री साईबाबांचे मंदिर खुले झाल्‍यामुळे व संस्‍थानच्यावतीने करण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांबाबत साईभक्‍तांकडून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे. तसेच कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना यशस्‍वीपणे नियोजन करण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे प्रयत्‍नशील आहेत.

संबंधित बातम्या