"श्रीरंगीयाना, प्रोस्ट्रॅटा निगरीस्पर्मा'चा शोध

Dainik Gomantak
बुधवार, 24 जून 2020

क्रोटालारिया कुळातील वनस्पती; शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे यश

ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी "क्रोटालारिया श्रीरंगीयाना' आणि "क्रोटालारिया प्रोस्ट्रॅटा निगरीस्पर्मा' या दोन वनस्पती शोधल्या आहेत. यातील "श्रीरंगीयाना' वाई-महाबळेश्‍वर मार्गातील पसरणी घाटात सापडते. "प्रोस्ट्रॅटा निगरीस्पर्मा' पन्हाळ्याजवळील मसाई पठार येथील गवताळ माळावर आढळते. दोन्ही वनस्पती जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि प्रा. डॉ. एन. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन झाले.
गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात रोकडे कन्याकुमारी ते मध्य प्रदेश टापूतील प्रदेशनिष्ठ क्रोटोलारिया वनस्पतींच्या गुणसूत्रांचा अभ्यास करत आहेत. यावेळी त्यांना पसरणी घाटात क्रोटालारिया प्रजातीमधील श्रीरंगीयाना वनस्पती आढळली. श्रीरंगीयाना वनस्पतीची फुले, शेंगांचा आकार वेगळा असल्याने एका स्वतंत्र वनस्पतीची नोंद झाली. ती हवेतील नत्र शोषून घेते आणि मुळांवरील गाठीमध्ये त्याचा साठा होतो. पुढे नत्र जमिनीत जाते. त्यामुळे जमिनीतील नत्र वाढते.
डॉ. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली "क्रोटालारिया प्रोस्ट्रॅटा निगरीस्पर्मा' वनस्पतीचे संशोधन झाले. मसाई पठारावर आढळलेली ही वनस्पती जमिनीलगत पसरते. ती फुलपाखरांच्या जीवनचक्रातील महत्त्वाची आहे. फायटोटॅक्‍सा या नियतकालिकामध्ये संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

नावातून व्यक्त केली कृतज्ञता
डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव ऊर्फ एस. आर. वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत. त्यांचे वनस्पती संशोधनात मोठे योगदान आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. एन. बी. गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वनस्पतीला यादवसरांच्या नावावरून "श्रीरंगीयाना' हे नाव देत कृतज्ञता व्यक्त केली.

श्रीरंगीयानाची वैशिष्ट्ये
- उंची दीड मीटर
- बियांचा आकार मोठा; पण संख्या कमी
- फुले पिवळी
- फुलोऱ्याचा कालावधी नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत
- जमिनीतील नत्र वाढवण्यास उपयुक्त

प्रोस्ट्रॅटाची वैशिष्ट्ये
- सपुष्प प्रजाती
- फुलोऱ्याचा कालावधी नोव्हेंबर ते जानेवारी
- वनस्पतीवर फुलपाखरांचे प्रजनन, अंडी घालणे होते

वनस्पतींच्या गुणसूत्रांबद्दलचे संशोधन सुरू असताना "क्रोटालारिया श्रीरंगीयाना' सापडली. या वनस्पतीला मराठीमध्ये "खुळखुळ' असे म्हटले जाते. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे. जमिनीतील नत्रवाढीसाठी उपयुक्त ठरू शकते.
प्रा. डॉ. एन. बी. गायकवाड

"क्रोटालारिया प्रोस्ट्रॅटा निगरीस्पर्मा' या वनस्पतीच्या बियांचा रंग काळा असतो. फुलपाखरांच्या काही प्रजातींचे जीवनचक्र या वनस्पतीवर अवलंबून आहे. त्यामुळे ही वनस्पती महत्त्वाची आहे.
- कृष्णात रोकडे, शिक्षक, पद्माराजे ज्युनिअर कॉलेज)
 

संबंधित बातम्या