सहा ड्रग्ज वितरकांना गोवा-मुंबईमधून अटक

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई

मुंबई:  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटींना अमली पदार्थ पुरवणाऱ्या रॅकेटचा माग घेणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबई, गोवा येथे आज शोधमोहीम राबविली. याप्रकरणी कारवाईच्या भीतीने अनेक  वितरक भूमिगत झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई आणि गोव्यातून सात जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

मुंबईतील पवई, अंधेरी परिसरात, तसेच गोवा येथे ‘एनसीबी’ने छापे घातले आहेत. त्याचप्रमाणे, रियाने अमली पदार्थांसाठी ज्यांच्याशी संपर्क साधला होता, अशा सर्वांना चौकशीसाठी बोलाविण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत एनसीबी ड्रग्ज तस्करांविरोधात जोरदार मोहीम सुरू करणार आहे. 

‘एनसीबी’ने ड्रग्ज प्रकरणात पेज थ्री सेलिब्रिटींशी संबंधित अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केली आहे. आता एनसीबी ड्रग्ज पुरवणाऱ्या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या शोधात आहे.

फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलिवूड वर्तुळात ड्रग्ज पुरवठा करणारे डझनभर वितरक यामुळे भूमिगत झाले आहेत.  त्यासाठी ‘एनसीबी’ने रविवारी विशेष शोधमोहीम राबवली होती. याप्रकरणी काही बॉलीवूड सेलिब्रिटींची यादीही ‘एनसीबी’ने तयार केली आहे. यात अठरा जणांचा समावेश असून या सर्वांना चौकशीचे समन्स पाठविण्यात येणार आहेत. 

रियाकडून २५ बड्या सेलिब्रिटींची नावे उघड
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. मात्र, त्यापूर्वी झालेल्या चौकशीत रियाने ड्रग्ज घेणाऱ्या २५ बड्या सेलिब्रिटींची नावे एनसीबीला सांगितली, अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. त्यामध्ये सुशांतचा शेवटचा चित्रपट  ‘दिल बेचारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचा समावेश असल्याचे समजते आहे. तसेच, आणखी दोन बड्या कलाकाराची नावेही रियाने घेतल्याची माहिती आहे. आतापर्यंत या प्रकरणात एनसीबीने रियाचा भाऊ शौवीक चक्रवर्ती तसेच काही ड्रग्ज पुरवठादारांना अटक केली आहे. रियाचीही या प्रकरणी एनसीबीने तीनदा चौकशी केली.

संबंधित बातम्या